येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
योगिता सूर्यवंशी (अहमदनगर) - निखळ मैत्रीचा ध्यास घेऊन नगरमध्ये सुरू झालेल्या मैत्री कट्टा या उपक्रमाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आगळावेगळा कार्यक्रम नगरकरांना संक्रांतीच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि. 14) अनुभवायला मिळणार आहे. मैत्रीच्या परिभाषेचे विविध पैलू उलगडण्यासाठी तीन खास पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
लेखक प्रणव सखदेव, समाज माध्यमतज्ज्ञ प्राची रेगे व लेखक डॉ. प्रकाश कोयाडे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला जाणार आहे. माऊली सभागृहात रविवारी (14 जानेवारी) सायंकाळी पाच वाजचा होणार्या या कार्यक्रमासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे.
दोन वर्षांपूर्वी मैत्री कट्टा उपक्रम काही मित्रांच्या संकल्पनेतून सुरू झाला. नगरचे छायाचित्रकार संजय दळवी, आर्टिस्ट ज्ञानेश शिंदे, स्थापत्य अभियंता सुरेंद्र धर्माधिकारी आणि कृष्णा मसुरे या नियमित भेटणार्या मित्रांमध्ये कायम वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळा संवाद होत. या संवादातून होत असलेल्या विचारमंथनाचा फायदा एकमेकांना होत असल्याचे हेरून त्यांनी या संकल्पनेला विस्तारीत स्वरूप दिले.
दि. 14 जानेवारी 2022 रोजी मैत्री कट्ट्याचा प्रारंभ झाला. या कट्ट्यावर कुणाचाही सत्कार, खानपान अगर वाढदिवस साजरा होत नाही. केवळ मैत्रीचे वलय असलेला संवाद येथे साकारतो. मैत्री कट्ट्यावर विषय, जात, जात, धर्म, हुद्दा आदींना थारा नाही. दोन वर्षांत मैत्री कट्ट्याचे स्वरूप विस्तारले आहे.
आतापर्यंत 49 जणांनी मैत्री कट्ट्याच्या माध्यमातून आपले विविध विषयांवरचे विचार मित्रांसमोर मनमोकळेपणाने मांडले आहेत. या कट्ट्याच्या दुसर्या वर्धापनदिनानिमित्त 50व्या कट्ट्याचा उत्सव रविवारी माऊली सभागृहात साजरा होत आहे.
या कार्यक्रमात लेखक प्रणव सखदेव, माध्यमतज्ज्ञ प्राची रेगे व लेखक डॉ. प्रकाश कोयाडे मनमोकळा संवाद साधून मैत्रीचे विविध पैलू उलगडतील. मैत्रीला वयाचे कुठलेही बंधन नसल्याने सर्व वयोगटातील रसिकांनी आपल्या मित्रांसह या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन मैत्री कट्टा परिवाराने केले आहे.