जाहिरात

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई, महसूलमंत्री बावनकुळे यांचे 'मंदिर महासंघा'ला आश्वासन


अमरावती : राज्यातील गंभीर दुष्काळजन्य परिस्थितीमुळे (drought situation) अडचणीत आलेल्या देवस्थान जमिनींना 'फार्मर आयडी' (Farmer ID) व अन्य जाचक अटींविना सरसकट आर्थिक मदत मिळण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून,

आगामी मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meeting) यावर ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.

'महाराष्ट्र मंदिर महासंघ' आणि विदर्भातील देवस्थान प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले, त्या वेळी ते बोलत होते.

सध्या राज्यातील अनेक भागांत भीषण दुष्काळ असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे देवस्थानांचे हक्काचे उत्पन्न बुडून त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शासकीय मदत जाहीर झाली असली, तरी प्रशासकीय अटी व 'फार्मर आयडी'च्या तांत्रिक अडचणींमुळे देवस्थानांना मदतीपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप महासंघाने केला आहे.

त्यामुळे पूर्वीप्रमाणेच सर्व देवस्थान जमिनींना विनाअट सरसकट भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या वेळी भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, आमदार सुनील वानखेडे आणि आमदार प्रतापराव अडसड यांचीही भेट घेऊन त्यांना निवेदन सोपवण्यात आले.

या शिष्टमंडळात 'मंदिर महासंघा'चे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट, अनुप जयस्वाल, हिंदु जनजागृती समितीचे (Hindu Janajagruti Samiti) समन्वयक श्रीकांत पिसोळकर यांच्यासह श्री पिंगळाई देवी संस्थान, श्री अवधूत महाराज संस्थान, श्री कोंडेश्वर संस्थान यांसह २५ हून अधिक देवस्थानांचे विश्वस्त व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवस्थानांच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा तीव्र ठेवण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !