नाशिक - कोरोनाच्या संकट काळात शासन, प्रशासन आणि नागरिकांचा पुढाकार कौतुकास पात्र आहेत. त्यामुळेच कोरोनाचा संकटकाळ हा आपणा सर्वांसाठी स्वावलंबी व सशक्त बनण्याची संधी आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सिमा हिरे, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे उपस्थित होते.
तसेच मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे उपस्थित होते. यावेळी भुजबळ म्हणाले, आज सर्व भारतीयांच्या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे. त्यातुन आपला महाराष्ट्र, आपला जिल्हाही या आपत्तीच्या सावटाखाली आहे. संकट भले कितीही मोठे असो आपण सर्वजण जात, धर्म, प्रांत, लिंगभेद विसरून त्याचा एक दिलाने सामना करु.
देशाला ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून देण्याचा चंग आपल्या क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी बांधला होता तसाच संकल्प आज देशाला, राज्याला, जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी आपण आजच्या स्वातंत्र्य दिनी करुया असे आवाहन भुजबळ यांनी केले. ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना तितक्याच झपाट्याने कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही लक्षणीय आणि आशादायी आहे.
आपल्या जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद प्रशासन तसेच आरोग्य प्रशासन यांचे अहोरात्र परिश्रम आहेत. त्यातील अनेकांना कर्तव्यावर असताना कोरोनाची बाधा झाली. त्यात पोलिस यंत्रणा व आरोग्यकर्मी अत्यंत जोखमीच्या शीर्षस्थानी आहेत. कोरोनाशी लढताना जीव गमवलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना दु:ख पचवण्याची क्षमता व बळ मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली.