अहिल्यानगर - आयुष्यातील दोन दशके अंधारात काढलेल्या एका ७१ वर्षीय माऊलीच्या जीवनात पुन्हा प्रकाशाचे (Ray of Hope) किरण फुलले आहेत. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील सरुबाई कांबळे या वृद्ध महिलेवर फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या (Phinix Social Foundation) माध्यमातून रेटिनाची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (Retina Opreation) यशस्वी करण्यात आली.
२० वर्षांचा संघर्ष आणि आर्थिक विवंचना : पाटोदा (ता. आष्टी, जि. बीड) येथील रहिवासी असलेल्या सरुबाई कांबळे यांचा २० वर्षांपूर्वी भीषण अपघात (Accident) झाला होता. या अपघातात त्यांनी आपला एक डोळा कायमचा गमावला. दुर्दैवाने, काही वर्षांपासून त्यांच्या दुसऱ्या डोळ्यातही गंभीर दृष्टीदोष (रेटिना समस्या) निर्माण झाला.
दोन्ही डोळ्यांनी दिसेनासे झाल्यामुळे सरुबाईंचे जीवन पूर्णपणे परावलंबी आणि अंधकारमय झाले होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने महागडी शस्त्रक्रिया (Surgery) करणे कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होते. अनेक डॉक्टरांनी मोठ्या खर्चासह दृष्टी परत येईल की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त केल्याने कुटुंब हताश झाले होते.
शिबिरामुळे मिळाला आशेचा किरण : नगर तालुक्यातील नागरदेवळे (Nagardeole) येथे फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने मोफत नेत्रतपासणी (Eye Check Up Camp) व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सरुबाई सहभागी झाल्या. तेथे त्यांनी जालिंदर बोरुडे (Jalindar Borude) यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
बोरुडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पुणे येथील के. के. आय बुधराणी हॉस्पिटलशी (KK Eye Budhrani Hospital) संपर्क साधला आणि त्यांच्या उपचाराची सर्व व्यवस्था केली. पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सरुबाईंच्या डोळ्यावर रेटिनाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर सरुबाईंना पुन्हा दिसू लागले.
नगर शहरात परतल्यावर जालिंदर बोरुडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी २० वर्षांनंतर दृष्टी मिळालेल्या सरुबाईंनी भावूक (Emotional) होऊन बोरुडे यांना मायेने कवटाळले आणि डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिले. हा हृदयस्पर्शी प्रसंग पाहून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
दीनदुबळ्यांसाठी 'फिनिक्स'चा आधार : फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून नियमितपणे अशा शिबिरांचे (Free Camp) आयोजन करून शेकडो गरजू, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोफत उपचार (Free Treatment) दिले जातात.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे एका महिलेच्या आयुष्यातील अंधार दूर झाल्याने सर्वस्तरातून फाऊंडेशनचे कौतुक होत आहे.
