येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
‘झुरळ पार्टी’ - लोकशाहीचा प्रतीकात्मक आवाज
देशातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीकडे आज बारकाईने पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते की, सामान्य माणूस विशेषतः तरुण वर्ग प्रचंड अस्वस्थ आहे. बेरोजगारी, वाढती महागाई, भ्रष्टाचार, शिक्षण व्यवस्थेची घसरलेली गुणवत्ता, प्रशासनातील दडपशाही आणि न्याय मिळवण्यासाठी करावी लागणारी संघर्षयात्रा यामुळे लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होताना दिसतो.
अशा काळात 'झुरळ पार्टी' (Cockroach Party) सारख्या प्रतीकात्मक आणि व्यवस्थेविरोधी विचार मांडणाऱ्या नव्या चळवळी तरुणांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. केवळ चर्चेपर्यंत मर्यादित न राहता युवा पिढी (Young Generation) त्याचे फॉलोअर्स बनत याला एक चळवळीचे रूप देतायेत, हे विशेष.
बेरोजगार पदवीधरांचा वाढता संताप : आज लाखो युवक उच्च शिक्षण घेऊनही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. स्पर्धा परीक्षा वर्षानुवर्षे रखडतात, पेपरफुटीच्या घटना घडतात आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. तरुणांच्या हातात पदव्या आहेत; पण भविष्य नाही.
ही परिस्थिती केवळ आर्थिक संकट नसून मानसिक आणि सामाजिक असंतोष निर्माण करणारी ठरत आहे. युवकांना वाटते की, सध्याची व्यवस्था त्यांच्या कष्टांचा योग्य सन्मान करत नाही. त्यामुळे व्यवस्थेविरोधी आवाज अधिक तीव्र होत आहेत.
महागाईने गुदमरत चाललेला श्वास : इंधन, अन्नधान्य, घरभाडे, शिक्षण, आरोग्य सेवा अशा प्रत्येक क्षेत्रात वाढलेले खर्च सामान्य कुटुंबाचे बजेट कोलमडून टाकत आहेत. मध्यमवर्ग आणि गरीब वर्ग दोघेही आर्थिक दडपणाखाली जगत आहेत. उत्पन्न स्थिर असताना खर्च सातत्याने वाढत असल्याने नागरिकांच्या असंतोषात भर पडत आहे.
शिक्षणाचा उपयोग काय? : एकेकाळी शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले जात होते. मात्र आज शिक्षण मोठ्या प्रमाणात व्यावसायिक झाले आहे. खाजगी शिक्षण संस्थांच्या वाढत्या फी, गुणवत्तेचा अभाव, कौशल्याधारित शिक्षणाची कमतरता आणि ग्रामीण भागातील शिक्षणाची दयनीय अवस्था हे गंभीर प्रश्न बनले आहेत. शिक्षण पूर्ण करूनही रोजगार मिळत नसल्याने तरुणांमध्ये “शिक्षणाचा उपयोग काय?” असा प्रश्न निर्माण होत आहे.
भ्रष्टाचार आणि दडपशाही : प्रशासनातील भ्रष्टाचार हा देशाच्या प्रगतीसमोरील सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. सामान्य नागरिकाला छोट्या कामासाठीही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दुसरीकडे, प्रश्न विचारणाऱ्यांना किंवा व्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्यांना विविध प्रकारच्या दबावाला सामोरे जावे लागत असल्याची भावना समाजात वाढताना दिसते. लोकशाहीमध्ये विरोधी मतांना स्थान असणे आवश्यक असते; मात्र नागरिकांना आपला आवाज दाबला जात असल्याची जाणीव निर्माण झाली तर आणि तरच असंतोष उफाळून येतो.
प्रतीक की इशारा? : ‘झुरळ’ हे प्रतीक साधारणपणे अशा गोष्टींसाठी वापरले जाते ज्या कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा उभ्या राहतात. याच प्रतिमेचा वापर करून उदयास येणाऱ्या विचारधारा किंवा चळवळी स्वतःला ‘सामान्य माणसाचा आवाज’ म्हणून सादर करतात. तरुण वर्ग अशा प्रतीकांशी जोडला जात आहे कारण त्यांना पारंपरिक राजकारणाबद्दल भ्रमनिरास होत चालला आहे.
ते अशा नेतृत्वाच्या शोधात आहेत जे थेट त्यांच्या प्रश्नांवर बोलेल आणि केवळ निवडणुकीपुरते आश्वासन देणार नाही. त्यामुळेच युवा पिढी स्वतःच नेतृत्व करण्यासाठी पुढे येत असून या भ्रष्ट व्यवस्थेला एक गर्भित इशारा देत आहे.
युवा पिढीसमोरील मोठा प्रश्न : आजचा युवक केवळ नोकरी किंवा पैशासाठी झगडत नाही; तो सन्मान, संधी आणि न्यायासाठीही संघर्ष करत आहे. त्याला पारदर्शक व्यवस्था, गुणवत्ताधारित संधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे. जर व्यवस्था या अपेक्षांकडे दुर्लक्ष करत राहिली तर भविष्यात मोठ्या सामाजिक आणि राजकीय बदलांची शक्यता नाकारता येणार नाही.
जनतेचा विश्वास म्हणजेच लोकशाही : देशातील परिस्थिती केवळ राजकीय वादाचा विषय नाही; ती सामान्य नागरिकांच्या जगण्याशी निगडित आहे. बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि शिक्षण व्यवस्थेतील बिघाड या समस्या वेळेत सोडवल्या नाहीत तर तरुणांमधील असंतोष अधिक तीव्र होऊ शकतो.
‘झुरळ पार्टी’ ही एखादी संघटना, विचारधारा किंवा प्रतीक असो, तिच्याबद्दल वाढणारे आकर्षण हे व्यवस्थेवरील नाराजीचे संकेत म्हणून पाहिले पाहिजे. लोकशाही टिकवायची असेल तर केवळ सत्ता टिकवणे पुरेसे नसते; जनतेचा विश्वास टिकवणे अधिक महत्त्वाचे असते.

.jpeg)