येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
पुणे - सांस्कृतिक राजधानी पुण्याच्या रंगभूमीवर रविवारी साहित्याचा सुवर्णस्पर्श आणि नाटकांचा दर्जेदार आविष्कार अनुभवायला मिळाला. पुण्यातील प्रसिद्ध ‘द बॉक्स’ थिएटर (The Box Thetre) येथे रविवारी (दि. ३ मे २०२६) अहिल्यानगरचे सुपुत्र, हरहुन्नरी अभिनेता, लेखक व दिग्दर्शक कृष्णा वाळके (Krushna Walke) यांच्या ‘म्हातारा पाऊस’ (Mhatara Paus) आणि ‘थडगं’ (Thadaga) या दोन नाटकांचे पुस्तक स्वरूपात दिमाखात प्रकाशन करण्यात आले.
कृष्णा वाळके यांचे हे पहिलेच पुस्तक असल्याने हा क्षण त्यांच्यासह उपस्थित सर्व नाट्यप्रेमींसाठी अत्यंत भावनिक आणि संस्मरणीय ठरला. या दिमाखदार सोहळ्याला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके (Satish Lotake), ज्येष्ठ अभिनेते नानाभाऊ मोरे (Nanabhau More) आणि निरंजन पेडणेकर (Niranjan Pednekar) यांसारखी रंगभूमीवरील मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.
याशिवाय लेखकाचे आई-वडील, कुटुंबीय, नातेवाईक आणि पुणे-अहिल्यानगरमधील नाट्यप्रेमींनी कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. हे पुस्तक अहमदनगर जिल्ह्यातील दर्जेदार पुस्तकांसाठी प्रसिद्ध असलेल्या 'शब्दालय प्रकाशन' (श्रीरामपूर) (Shabdalay Prakashan) यांनी प्रकाशित केले आहे.
पुस्तकाचे प्रकाशन होताना लेखकाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेले. उपस्थित मान्यवरांनी कृष्णा वाळके यांच्या लेखणीचे कौतुक करताना म्हटले की, कृष्णाच्या नाटकांमध्ये मातीचा गंध आणि माणसाच्या जगण्याचा संघर्ष अतिशय ताकदीने उतरला आहे. हे दोन पथदर्शी प्रयोग मराठी रंगभूमीला नक्कीच समृद्ध करतील.
उपस्थितांनी पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करत लेखकाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. पुस्तकाच्या प्रकाशनासोबतच याच दिवशी ‘नाट्यमहोत्सव तुमचा-आमचा’ हा अनोखा नाट्यमहोत्सव अत्यंत रंगतदार पद्धतीने पार पडला. या महोत्सवामध्ये एकाच दिवशी एकापाठोपाठ एक अशा दर्जेदार विषयांवरील पाच नाटकांचे प्रयोग सादर करण्यात आले. यामध्ये:
- पॉपकॉर्न
- कॉर्पोरेट कबूतर
- भूताचं भविष्य
- थडगं
- लाली
या पाचही नाटकांना पुणेकर नाट्यरसिकांनी हाऊसफुल गर्दी करत डोक्यावर घेतले. विनोदी, कौटुंबिक आणि गंभीर सामाजिक विषयांवर प्रकाश टाकणाऱ्या या नाटकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सकाळपासून सुरू झालेल्या या नाट्यमय प्रवासाचा रात्री उशिरा निरोप घेताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर थकव्याऐवजी उत्कृष्ट कलाकृती पाहिल्याचा आनंद आणि ताजेपणा स्पष्टपणे जाणवत होता. दर्जेदार साहित्य आणि रंगभूमीचा हा मिलाफ पुणेकरांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरला.
