येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - नगरकरांसाठी एक अत्यंत अभिमानाची आणि उत्सुकता वाढवणारी बातमी आहे. अहिल्यानगरमध्ये गुन्हेगारी (Crime) विषयावर आधारित असणारी पहिलीच काल्पनिक वेबसिरीज (Web Series) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'साज क्रिएशन' (Saaj Creation) या प्रोडक्शन हाऊस निर्मित 'नगर फाईल्स' (Nagar Files) या वेबसिरीजचे चित्रीकरण सध्या अहिल्यानगर शहर आणि आसपासच्या परिसरात जोमाने सुरू आहे. विशेष म्हणजे, या वेबसिरीजच्या माध्यमातून स्थानिक भागातील निसर्ग आणि वास्तू प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.
सध्या अहिल्यानगर शहरासह निंबळक, ऐतिहासिक चांदबिबी महाल (Chandbibi Mahal), चास आणि नागापूर या भागात सिरीजचे महत्त्वाचे सीन शूट केले जात आहेत. या वेब सिरीजमध्ये एकूण २२ भागांचा थरार दिसणार आहे. त्यापैकी २ भागांचे शूट पूर्ण झाले आहे.
थ्रिलर (Thriller) आणि सस्पेन्सने (Suspence) भरपूर असलेल्या या वेबसिरीजचे लेखन आणि दिग्दर्शन कबीर राज यांनी केले असून, सहदिग्दर्शनाची धुरा सागर खिस्ती सांभाळत आहेत. एकूण २२ भागांचे नियोजन असलेल्या या सिरीजमधील पहिल्या दोन भागांचे चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
तांत्रिक बाजूचा विचार केला तर, प्रदीप शिरसाट हे या वेबसिरीजचे छायाचित्रण (Cinematography) करत असून, संकलनाची (Editing) महत्त्वाची जबाबदारी प्रमोद सोनवणे यांच्याकडे आहे. या वेबसिरीजमध्ये अनेक मातब्बर आणि नवोदित कलाकारांची फौज असणार आहे.
यात कबीर राज, जय खुडे, जे. बी. शिंदे, विशाल कुटे, तुलसी पुरी, तुकाराम पुरी, अविनाश कराळे, खुशी घटाने, अनिकेत भुजंग, समृद्धी खिस्ती, अश्विनी वसगडेकर, गौरी देशट्टी, ललित काळे, ज्योती खिस्ती, सागर खिस्ती आणि बालकलाकार सृजन वराडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
अहिल्यानगरच्या पार्श्वभूमीवर आणि गुन्हेगारी विषयावर तयार होणारी ही जिल्ह्यातील पहिलीच वेबसिरीज आहे. त्यामुळे या सिरीजला नगरकर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
या बहुप्रतिक्षित वेबसिरीजचा पहिला भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

