आईच्या आरोग्याची काळजी हीच खरी कृतज्ञता! २७० महिलांची मोफत नेत्र तपासणी


अहिल्यानगर - 'मातृत्व दिन' (Mothers Day) हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नसून, ज्या माऊलीने आपल्याला जग दाखवले, तिच्या डोळ्यांची आणि आरोग्याची काळजी (Health Care) घेण्याचा दिवस आहे.

याच उदात्त भावनेतून फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या (Finix Social Foundation) वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिर परिसरात पार पडलेल्या या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी एकूण २७० रुग्णांची सखोल नेत्र तपासणी (Eye Check up) केली. यापैकी ४७ रुग्णांची मोतीबिंदू व काचबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे.

या सर्व शस्त्रक्रिया पुणे येथील नामांकित के.के. आय बुधराणी हॉस्पिटल (KK Eye Budhrani Hospital Pune) मध्ये पूर्णतः मोफत केल्या जाणार आहेत.

यावेळी ​नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प करण्यात आला. या ​शिबिराचे उद्घाटन उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले. केवळ तपासणीच नाही, तर यावेळी नेत्रदान आणि अवयवदानाबाबत मोठे जनजागृती अभियान राबवण्यात आले.

समाजाप्रती आपली बांधिलकी जपत अनेक महिलांनी यावेळी स्वतःहून नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प केला, जे या शिबिराचे मोठे यश मानले जात आहे. ​मातृत्वाचे ऋण कोणत्याही स्वरूपात फेडता येत नाही.

ग्रामीण भागातील अनेक माता स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्यापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवून त्यांच्या अंधकारमय जीवनात प्रकाश निर्माण करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे, असे फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे (Jalindar Borude) म्हणाले.

​​नेत्र तपासणीसोबतच ज्येष्ठ नागरिकांची रक्तदाब (BP), मधुमेह (Sugar) व इतर सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना अत्यंत अल्पदरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले असून डॉक्टरांनी आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

​या यशस्वी उपक्रमासाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, बुधराणी हॉस्पिटलचे विशाल भिंगारदिवे, तसेच गौरव बोरुडे, सौरभ बोरुडे, राजेंद्र बोरुडे, ओम बोरुडे आणि बुधराणी हॉस्पिटलचे सचिन पगार यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिबिराची ठळक वैशिष्ट्ये :
  • स्थळ : संत सावता महाराज मंदिर, नागरदेवळे.
  • सहकार्य.: के.के. आय बुधराणी हॉस्पिटल, पुणे.
  • लाभार्थी : २७० रुग्ण (४७ मोफत शस्त्रक्रिया).
  • विशेष : महिलांचा नेत्रदान व अवयवदानासाठी पुढाकार.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !