घोडेगाव (दादा दरंदले) - आषाढी वारी (Aashadhi Vari) म्हणजे भक्ती, समर्पण आणि सेवाभावाचा अखंड उत्सव. याच सेवाभावाचा जिवंत अनुभव सध्या नेवासा तालुक्यातील घोडेगाव (Ghodegaon) येथे पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), जळगाव (Jalgaon) आणि अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील विविध भागांतून निघालेल्या शेकडो वारकऱ्यांच्या पायी दिंड्या घोडेगाव मार्गे पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
या विठ्ठलनामाच्या गजराने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे. घोडेगावाने अक्षरशः अन्नदानाचे आगार आणि सेवाभावाचे तीर्थक्षेत्र अशी ओळख निर्माण केली आहे.
गावातील प्रत्येक रस्ता, चौक आणि मंदिर परिसरात 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने वातावरण भारावून गेले आहे. वारकरी हेच विठ्ठलाचे रूप मानत ग्रामस्थांनी त्यांची सेवा करण्याचा संकल्प केला आहे.
सकाळचा गरमागरम नाश्ता, दुपारचे स्वादिष्ट भोजन, सायंकाळचा चहा (Tea), पिण्याचे थंड पाणी (Drinking Water), शीतपेय (Colddrink, फळे आणि विश्रांतीची उत्तम व्यवस्था अशा विविध माध्यमांतून वारकऱ्यांची मनापासून सेवा केली जात आहे.
भोजनासाठी थांबलेल्या प्रत्येक दिंडीचे (Dindi) प्रेमाने स्वागत केले जात आहे. अनेक दिंड्यांचा मुक्कामही घोडेगावमध्ये होत आहे. त्यांच्या निवास, स्वच्छता आणि इतर सोयींचे नियोजन ग्रामस्थांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि आपुलकीने केले आहे.
सेवाभावातून कार्य करणारे स्वयंसेवक आणि अन्नदाते दिवस-रात्र वारकऱ्यांच्या सेवेत तत्पर असल्याचे चित्र सर्वत्र दिसूत आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान, त्यांच्या ओठांवरील विठ्ठलनाम आणि ग्रामस्थांच्या सेवाभावातून घोडेगावमध्ये भक्ती, माणुसकी आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे.
'अन्नदान हेच श्रेष्ठ दान' या संतवचनाचा प्रत्यय घोडेगावातील प्रत्येक सेवाकार्यातून येत आहे. विठ्ठलभक्तांच्या सेवेत धन्यता मानणाऱ्या ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
