उत्पन्न वाढीसाठी 'हे' महामंडळ चालवणार पेट्रोल पंप

मुंबई - आजपर्यंत प्रवासी वाहतुक करणे हेच एसटीचे काम होते. पण आता एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेल पंप सुरु करीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

सह्याद्री भवन येथे परिवहन मंत्री परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एसटी महामंडळ आणि इंडियन ऑईल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारानुसार भविष्यात राज्यातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर ३० ठिकाणी पेट्रोल-डिझेलपंप आणि ५ ठिकाणी एल.एन.जी.पंप (Liquifid Natural Gas) सुरु करण्यात येणार आहेत. 

हे पेट्रोल-डिझेल पंप/ एल.एन.जी.पंप इंडियन ऑईलकडून बांधण्यात येणार आहेत. तर त्याचे संचालन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे. अनिल परब म्हणाले, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या प्रवासी तिकिटातून मिळणाऱ्या हजारो कोटीच्या उत्पन्नाला एसटीला मुकावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटीने पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. 

प्रामुख्याने मालवाहतुकीसारख्या उपक्रमाला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच टायर पुनर्स्थिरीकरण प्रकल्पातून देखील व्यावसायिक स्तरावर उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक उत्पन्न स्त्रोतांबरोबरच राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या एसटीच्या मोकळ्या जागेवर इंडियन ऑईलच्या सहकार्याने सर्वसामांन्यांसाठी पेट्रोल-डिझेल/एल.एन.जी. पंप उभारले जाणार आहेत.

या विक्रीतून एसटी महामंडळाला कायमस्वरूपी उत्पन्नाचा एक स्थिर स्त्रोत निर्माण होईल. याप्रसंगी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व एसटीच्या वरिष्ठ अधिकऱ्यांसह इंडियन ऑईलचे महाराष्ट्र प्रमुख अमिताभ अखवैरी, महाव्यवस्थापक राजेश जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !