नंदुरबार - लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आणि कुटुंबाच्या भेटीची ओढ असलेल्या अनेक मजूर आणि नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या ‘लाल परी’द्वारे जिल्ह्यातून 18 हजार मजूर आणि नागरिकांना शेजारील राज्याच्या सीमेवर किंवा त्यांच्या जिल्ह्यात पोहोचविण्यात आले, त्यापैकी फक्त नवापूर येथून 15 हजार प्रवाशांची सुविधा गेल्या आठवडाभरात करण्यात आली.
गुजरात येथे काम करणारे हजारो मजूर नवापूर येथे राज्याच्या सीमेवर अडकले होते. तहसीलदार उल्हास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाने त्यांच्या प्रवाशासाठी नियोजन केले. सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रवासाचे मार्ग व वेळापत्रक निश्चित करण्यात आले. सर्व प्रवाशांना बसेसद्वारे नियोजनपूर्वक विविध ठिकाणी पाठविण्यात आले.
सर्वाधिक प्रवाशांना मध्यप्रदेश सीमेवर बिजासन येथे सोडण्यात आले. हे सर्व मजूर उत्तर भारतातील होते. त्यासाठी 568 बसेस सोडण्यात आल्या. प्रत्येक बसेमध्ये साधारण 22 मजूरांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पाठविण्यात आले. बंगाल आणि ओरिसाकडे जाणाऱ्या मजूरांना गोंदियापर्यंत 78 बसेसद्वारे सोडण्यात आले. नंदुरबार आगाराच्या बसेसचा हा सर्वात लांबचा प्रवास होता.