सोनई हादरली ! कुख्यात गणेश वडघुलेची निर्घृण हत्या; चौघांना अटक


अहिल्यानगर - जुन्या घरावर का आलास? या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात होऊन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका ३६ वर्षीय तरुणाचा कोयता, खोरे आणि लाकडी दांडक्याने वार करून निर्घृण खून (Murder) करण्यात आला. गणेश दत्तात्रय वडघुले (वय ३६) (Ganesh Vadghule) असे मृत तरुणाचे नाव आहे.

सोनई-कांगोणी रोडवरील वडघुले वस्तीवर मंगळवारी रात्री ८:३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्परता दाखवत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मयताच्या आईने सोनई पोलीस ठाण्यात (Sonai Police Station) फिर्याद दिली आहे.

नेमकं काय घडलं? मयत गणेश वडघुले हा मंगळवारी रात्री आपल्या जुन्या घरी गेला होता. याचा राग मनात धरून नातेवाईक असलेल्या आरोपींनी त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली. वादाचे (Controvercy) पर्यावसान हाणामारीत झाले.

संतापलेल्या आरोपींनी लोखंडी हत्यारे, कोयता, खोरे आणि लाकडी दांडक्याने गणेशच्या डोक्यावर व शरीरावर वर्मी घाव घातले. हा हल्ला इतका भीषण होता की, गणेशचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्यातील चौघांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश आहे.
  • विठ्ठल रंगनाथ वडघुले
  • भगवान विठ्ठल वडघुले
  • संभाजी विठ्ठल वडघुले
  • गौरी भगवान वडघुले

या घटनेची माहिती मिळताच शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी, सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी (API Vijay Mali) आणि पोलीस निरीक्षक सूरज मेढे (PSI Suraj Medhe) यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीची चर्चा : मयत गणेश वडघुले हा देखील अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी (Criminal Background) असल्याची नोंद पोलिसांकडे आहे. माजी पंचायत समिती सदस्याच्या मुलाचे अपहरण, जबरी चोऱ्या आणि इतर गंभीर प्रकरणांमध्ये त्याचे नाव चर्चेत होते.

सोनई परिसरात वाढती दादागिरी, भाईगिरी आणि अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारीने डोके वर काढले आहे, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. ‘गावात दहशत माजवणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी आणि सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) कार्यान्वित करावेत,’ अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सोनई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय माळी आणि पोनि सूरज मेढे पुढील तपास करत आहेत. गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !