नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेले सुमारे चार महिनेपासून बंद असलेल्या असलेल्या शाळा १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने एक योजना आखली आहे. येत्या ३१ ऑगस्टला यासंदर्भात केंद्र सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे. एका वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २३ मार्चपासून देशातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद आहेत. सध्या उन्हाळ्याची सुटी संपूनही शाळा सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे पर्याय म्हणून सध्या देशात ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. परंतु ३१ ऑगस्ट रोजी 'अनलॉक'ची नवी गाइडलाईन जाहीर होत आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबतची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्त्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतक शाळा सुरु करण्याच्या योजनेवर चर्चा झाली आहे. परंतु, विद्यार्थ्यांना शाळेत कसे आणि कधी आणायचे हे संबंधित राज्यांनी ठरवावे, असे या बैठकत समोर आले आहे. शाळांना दोन शिफ्टमध्ये काम करावे लागू शकते. सकाळी ८ ते ११ आणि १२ ते ३ अशा शिफ्ट असतील. ११ ते १२ या ब्रेकमध्ये शाळा सॅनिटाइज करावी लागेल.
सध्या तरी प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याचा विचार झालेला नाही. तसेच शाळेच्या वेळमर्यादेत सहावी ते नववीचे वर्ग सुरु केले जाण्याची शक्यता आहे. एका इयत्तेतील सर्व तुकड्यांना एकाच दिवशी शाळेत बोलावले जाणार नाही. प्रत्येक तुकडीला दिवस ठरवून दिला जाईल.
तसेच पहिल्या पंधरवड्यात १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाईल, असेही सांगितले जात आहे. अर्थात सध्या तरी असे नियोजन करण्याचे ठरले आहे. परंतु, ३१ ऑगस्टपर्यंत देशात काय परिस्थिती असते, यावरच पुढील निर्णय अवलंबून असणार, हे मात्र निश्चित आहे.