जय श्रीराम ! नेवाशात घरोघरी श्रीराम पूजन !

नेवासे (अहमदनगर) - फटाक्यांची आतषबाजी करून पेढे व लाडूंचे वाटप करून नेवासा येथे घरोघरी प्रभू रामचंद्रांच्या  प्रतिमेचे पूजन व आरतीद्वारे श्रीराम जन्मभूमी मंदिराचा भूमिपूजन व शिलान्यास कार्यक्रमाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


अयोध्येला बुधवारी दि. ५ ऑगस्ट रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संतमहंतांच्या उपस्थितीत शिलान्यास व भूमिपूजन सोहळा होत आहे. तर नेवासा येथील श्रीराम मंदिरात चार ते पाच लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसिंगचे पालन करत पूजापाठ करून आरती करण्यात आली.

नेवासा शहरामध्ये विविध तरुण मंडळांच्या कार्यकर्ते व रामभक्तांनी फटाक्यांची आतषबाजी करत भूमिपूजन व शिलान्यासाचा हा आनंदोत्सव साजरा केला आतषबाजी व प्रभू रामचंद्र भगवान की जय...जय श्रीराम.. जय जय श्रीराम अशा घोषणांनी यावेळी आसमंत दुमदुमून गेला होता. 


यावेळी रस्त्यावरील पादचाऱ्यांना या रामभक्तांनी पेढे व लाडू वाटून तब्बल ५०० वर्षानंतर साकार झालेल्या मंदिर निर्माणाच्या स्वप्नपूर्तीचे तोंड गोड करून स्वागत करण्यात आले.तर काही ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे पालन करत मारुती मंदिरात भजने गाऊन हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

यानिमित्ताने घरोघरी भगवे ध्वज लावण्यात येऊन गुढ्या ही उभारण्यात आल्या होत्या. तर सुवासिनींनी घरांसमोर सडामार्जन करून रांगोळ्या घालून परिसर सुशोभित केला. गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी केलेल्या आवाहनानुसार नेवासा तालुक्यात श्रीराम भक्तांनी घरोघर पाटावर कपडा घालून व रांगोळी काढून प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमांचे पूजन केले.

सर्व कुटुंबासमवेत आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले.या सर्व धार्मिक कार्यक्रमामुळे नेवासा येथील वातावरण श्रीराममय बनले होते.तसेच रामभक्तांनी गल्लोगल्ली पेढे व लाडूंचे वाटप करून हा आनंदोत्सव साजरा केला. नेवासे नगरी आणि संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण होते. 
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !