नागपूर - नागपूर शहराचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सध्या 'वर्क फ्रॉम होम' सुरु केले आहे. पालिकेत जाऊन दालनात बसण्याऐवजी किंवा रस्त्यावर येऊन फिल्ड वर्क करण्याऐवजी मुंढे यांनी स्वताला 'आयसोलेटेड' करुन घेतले आहे. त्यांनी स्वतःच ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
मुंढे यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. तसेच पुढील सर्व प्रकारची काळजी देखील घेत आहेत. कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर पाळावयाच्या सर्व सूचनांचे पालन आपण करत आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.
तसेच गेले चौदा दिवसांच्या कालावधीत कामानिमित्त जे जे लोक आपल्या संपर्कात आले आहेत, त्यांनीही आपापली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच घरात आयसोलेटेड करून घेतलेले असले तरी आपण घरातून शहरातील परिस्थितीचा आढावा घेत आहोत. घरातून सर्व उपाययोजना आणि सूचना देत आहोत, असेही तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.