सार्वजनिक जीवनामध्ये आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करीत असतो. पण कोणतेही कार्य असो, त्यामागे खूप आनंद दडलेले असतात. एखाद्या क्षेत्रातील विधायक निर्मितीचा आनंद तर मनाला खूप सुख देत असतो. आनंद फक्त ओबेरॉय, 'ताज'मधील डिनरमधे असतो, तसा एखाद्या भुकेल्या आजीला जेवणाचा डबा पोहोचविण्यातही खूप सारा असतो. पण ते आपल्याला समजायला हवं.
नाहीतर समुद्र किनाऱ्यावर फिरताना लाटेत पाय बुडवले तरी ते कोरडेच, असं काहीसं होऊन जातं. आपण चौकटीत खूपदा राहतो. कुटुंबातल्या चौकटीत. त्यापुढे काहींना काही दिसतही नसतं. परंतु त्याबाहेरच्या जगात खूप सारा आनंद आपली वाट पाहत असतो. जशी घरातील कुटुंबियांच्या सहवासातील प्रसन्नता असते, तसे बाहेरच्या जगातही खूप साऱ्या फुलांचे सुगंध दरवळत असतात.
केवळ झाडाचे पानं पहाणे यापेक्षा त्या पानातील हिरवाई जर आपल्याला समजली तर त्यासारखे सुख नाही.
वेगाने धावण्याच्या नादात असे खूपसे आनंद आपण बऱ्याचदा घालवून बसत असतो. मी तर म्हणेन कोणत्याही गोष्टींवर प्रेम करा जे तुम्हाला भावेल. पण त्या प्रेमात खरेपणा, ती अस्सलता असली की जीवनाचा अर्थ आपोआप समजतो. कोणाचं सुख पैसे कमविण्यात तर कोणाचं सुख दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यात असतो.
कालपर्यंत आपण खूप सारी स्वप्नं पाहात आपला जीवन प्रवास सुखाचा करण्यासाठी पळत असायचो.. आज असं वाटू लागलं आहे, की जगणं शाबूत ठेवण्यासाठी धडपडत आहोत. सकाळी उठल्यावर मला ताप तर नाही ना.. खोकला येत नाही ना..? याची काळजी घेऊ लागलो आहोत. म्हणजे गेल्या काही महिन्यात आपले जगण्याचे संदर्भ किती बदललेत ?
आता ट्रेकिंग, समुद्र किनारा, मित्रांबरोबर एखाद्या डोंगरावर मैफिल जमवावी... असे खूप सारे आनंद लुटावेत.. अगदी मनापासून... निस्वार्थ भावनेने.. केवळ त्यात दडलेले आनंद मिळविण्यासाठी.. खरंच आहे... निसर्गावर प्रेम करायलाच हवं.. आपण निसर्गात रहात असतो. तो आपल्याला सांभाळत असतो... पण आपणच आपल्याला जगज्जेते समजल्यावर कसे चालेल..
असंही सारखं वाटायचं कधी, की मी अमुक ठिकाणी गेलो नाहीतर त्यांचा खोळंबा होईल. आपण नसलो की सगळं काही थांबून जाईल.. पण तसं काहीही नसतं, आपणच आपल्याला महत्वाच्या यादीत टाकून देत खूप काही गमावून बसलो आहोत.. कष्ट तर आपल्याला घ्यावी लागणारच आहेत. पण त्याच बरोबर जगाकडे सहजपणे पाहिलं की त्याचा आनंद किती सुख देऊन जाते हेही समजून घ्यावी लागणार आहे..
- जयंत येलुलकर,
(रसिक ग्रुप, अहमदनगर)