अहमदनगर - घोडेगाव (ता. नेवासा) येथील श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिरातून चांदीचे दागिने चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा एक आठवडा झाला तरी तपास लागलेला नाही. त्यामुळे ८ दिवसांपूर्वी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या ग्रामस्थांनी या विषयावर पुढील भूमिका काय घ्यायची, हे ठरवण्यासाठी शनिवारी सायंकाळी ६ वाजता देवीच्या मंदिरात 'हितगुज बैठकी'चे आयोजन केले आहे.
गेल्या आठवड्यात दिनांक १९ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिराच्या गाभार्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेला एक आठवडा झाला असला तरी अजून चोरट्यांचा तपास लागलेला नाही. इतकेच काय पोलिसांना याप्रकरणी कुठलेही धागे-दोरे अजून गवसलेले नाहीत.
घोडेगावच्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून बसवलेली मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. त्यामुळे गेल्या गुरुवारी झालेल्या चोरीचा प्रकार विनासायास पार पडला. ही बाब चोरी झाल्यानंतर ग्रामस्थांच्या लक्षात आली. हे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असते तर चोरट्यांना शोध घेणे पोलिसांना सोपे गेले असते. परंतु नेमके सीसीटीव्ही फुटेजच नसल्यामुळे पोलिसांना तपासात अनेक अडचणी येत आहेत.
ही चोरीची घटना ग्रामस्थांच्या भावनेचा व श्रद्धेचा विषय असल्याचे नमूद करीत घोडेगावचे सरपंच राजेंद्र देसरडा व बहुसंख्य ग्रामस्थांनी सोनई पोलिसांना याबाबत लेखी निवेदन दिले होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष ज्ञानदेव कोरडे यांनीही या चोरीचा तपास लवकरात लवकर लावावा, अशी मागणी केली होती. लवकरात लवकर चोरट्यांचा शोध लागला नाही तर गावात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला होता.
मात्र अजूनही तपास लागलेला नसल्याने आज शनिवार (दि. 28 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी ६ वाजता घोडेश्वरी देवीच्या मंदिरात 'हितगुज बैठकी'चे आयोजन केलेले आहे. ग्रामस्थांनी या चर्चेत सहभागी होण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या बैठकीत काय चर्चा होते, काय निर्णय होतो, नेमकी काय भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्व ग्रामस्थांचे व पंचक्रोशीतील देवीच्या भक्तांचे लक्ष लागलेले आहे.
पोलिसांची दोन पथके तपासावर
मंदिरातील चोरीच्या घटनेचा तपास करण्यासाठी सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे व सहकारी, तसेच एलसीबीचे पीआय अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके गेली आठ दिवस कसून तपास करीत आहेत. पण या तपासाबाबत दोन्ही पथकांना अजूनही कुठलेच धागेदोरे गवसलेले नाहीत.
अधिकारी 'नवे' आहेेत म्हणून..
सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे हे नव्यानेच जिल्ह्यात आले आणि लगेचच चोरीची घटना घडली. त्यामुळे त्यांनी गावकऱ्यांना शांतता कायम राखण्याचे आवाहन करीत कसोशीने तपास करण्याची ग्वाही दिलेली आहे. एपीआय करपे हे स्वतः या गुन्ह्याच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत.
पोलिसांचे खबऱ्यांचे 'नेटवर्क' दुबळे
घोडेगाव पोलीस चौकीत कायमस्वरूपी नियुक्त केलेले पोलिस कर्मचारी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या हद्दीत कार्यरत आहेत. परंतु त्यांचेही खबऱ्यांचे नेटवर्क दुबळे असल्याचे खेदाने नमूद करावे लागेल. कारण या चोरीच्या घटनेबाबत किमान एखादा तरी धागादोरा पोलिसांना आतापर्यंत सापडायला हवा होता.
फक्त 'सीसीटीव्ही'चेच कारण ?
मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद होती, त्यामुळे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले नाही. नाहीतर तपास लागला असता, असे पोलिस म्हणतात. त्यामुळे हा तपास सीसीटीव्ही फुटेजवाचून होऊच शकत नाही, असे सध्या तरी दिसत आहे. मग गावात नेहमी 'उठबस' असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे 'नेटवर्क' व 'संपर्क' काय कामाचा, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
'त्या' चोऱ्यांचाही तपास नाही
काही महिन्यांपूर्वी घोडेगावातील भर वस्तीमध्ये पाच ते सहा ठिकाणी धाडसी घरफोड्या झालेल्या आहेत. त्यांचाही अजून काहीच तपास लागलेला नाही. काही वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून गावात बसवलेली सीसीटीव्ही यंत्रणाही बंद पडली आहे. याचा परिपाक म्हणून चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, असे नागरिक म्हणत आहेत.
हेही वाचा
घोडेश्वरी देवीच्या मंदिरात धाडसी चोरी, ११ लाखांचे दागिने पळवले
घोडेश्वरी देवीचे दागिने चोरणाऱ्यांना दोन दिवसांत शोधा, अन्यथा आंदोलन
आमचे फेसबुक पेज लाईक करा
तसेच यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा