नाशिक जिल्हा शेतकरी, कामगार, विद्यार्थी संघटनांचे आवाहन
व्यापारी वर्गाने बंद पाळून शेतकऱ्यांना साथ द्यावी
नाशिक: अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समनव्य समितीने दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारत बंद चे आवाहन केेले आहे. यात ३५० पेक्षा अधिक शेतकरी संघटना सहभागी आहेत. नाशिक जिल्ह्यात भारत बंद यशस्वी होण्यासाठी आज शेकाप कार्यलय नाशिक येथे बैठक झाली. बैठकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना पक्ष यांनी भारत बंद मध्ये सहभागी व्हावे. तसेच लढत असलेल्या अन्नदाता शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी व्यापारी, रिक्षा, टॅक्सी, सर्व दुकान दारांनी बंद पाळून साथ द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी (ता. ६) नाशिक शहरात विभागवार बैठका घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. सोमवारी व्यापारी, दुकानदार, मुख्य बाजार पेठा यांना भेटून आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी पुत्रांनी सोशल मीडियावर मोहीम राबवावी. सर्वानी मिळून भारत बंद यशस्वी करावा. आंदोलन मध्ये शाहिद झालेल्या शेतकऱ्यांना बंद यशस्वी करून आदरांजली अर्पण करण्याचा निर्धार यावेेळी करण्यात आला.
केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट धार्जिण्या व शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक वळण घेत आहे. दिल्ली येथे संपन्न झालेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारत बंद ची हाक देण्यात आली आहे. देशातील ५०० हून अधिक शेत
करी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदमध्ये शेतकऱ्यांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात समविचारी शेतकरी संघटना तसेच कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला व समाजसेवी संघटनांचा समन्वय करून महाराष्ट्रात भारत बंदच्या दिवशी महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
महाराष्ट्रातील भाजप सोडून उर्वरित सर्वच राजकीय पक्षांनी भारत बंदच्या दिवशी महाराष्ट्र बंद व्हावा यासाठी शेतकऱ्यांना समर्थन द्यावे व बंद यशस्वी करण्यासाठी सक्रियपणे आंदोलनात उतरावे. विशेषतः शिवसेना, राष्ट्रवादी काँगेस व काँग्रेस या सत्ताधारी पक्षांनी शेतकऱ्यांच्या या बंदला समर्थन द्यावे. देशभरातील विविध राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजप विरहित पक्षांनी त्या त्या राज्यांमध्ये भारत बंदला सक्रिय पाठिंबा देत शेतकऱ्यांची ठाम बाजू घेतली आहे.
महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांनीही भारत बंदच्या दिवशी होणाऱ्या महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी व्हावे. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांना रोखण्यासाठी सुरू असलेल्या दिल्ली येथील अन्नदाता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील जनतेने भारत बंदच्या दिवशी कडकडीत बंद ठेवून शेतकरी आंदोलनाचे समर्थन करावे.
बैठकीस सिटूचे नेते डॉ. डी. एल. कराड, भाकप नेते कॉम्रेड राजू देसले भाकप, शेकाप नेते अड. मनीष बस्ते, आरपीआय नेते गणेश उनव्हणे, सुनिल मालुसरे (माकप), संदीप जगताप (स्वाभिमानी शेतकरी संघटना), तुषार पाठोरे (शेकाप), विजय दराडे (किसानसभा), शशि उन्हवणे (पीपल्स रिपब्लिकन पार्टी), तानाजी जायभावे, सिताराम ठोंबरे, तुकाराम सोनजे, नितिन मते (राष्ट्र सेवा दल), आण्णासाहेब कटारे (आरपीआय), तलाहा शेख (ऑल इडिया स्टुडंट फेडरेशन), समाधान बागुल, सदाशिव गणगे, आम्रपाली वाकळे (छात्रभारती), किरण मोहिते (भारतीय हितरक्षक सभा), गिरीष आकोळकर (राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष), सचिन मालेगावकर उपस्थित होते.