प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जमीन सुपिकता निर्देशांक फलक

मुंबई - शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल असे गावातील जमिनीतील अन्न घटकांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत किती प्रमाणात द्यावेत, याची माहिती देणारे सुपिकता निर्देशांक फलक राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत लावावेत. 5 डिसेंबर रोजी जागतिक मृददिनानिमित्त प्रत्येक गावात कार्यशाळा आयोजित करण्यात यावी, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.          

ग्रामपंचायत स्तरावर सुपिकता निर्देशांक फलक लावण्याबाबत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कृषी आयुक्त धीरज कुमार, सह सचिव गणेश पाटील उपस्थित होते. दरवर्षी 5 डिसेंबरला जागतिक मृद दिन साजरा केला जातो. यावर्षी हा दिन साजरा करताना प्रत्येक गावात कार्यशाळा घ्यावी. त्यावेळी

 गावातील अन्नद्रव्यांचा सुपिकता निर्देशांक त्या गावातील जमिनीमध्ये असणारे घटक त्याला आवश्यक खत आणि त्याची मात्रा या संदर्भात शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती द्यावी. त्याचबरोबर गावातील प्रमुख पिकांच्या मार्गदर्शनासाठी ग्रामपंचायतीमध्ये फलक लावावेत, असे आवाहन कृषिमंत्री भुसे यांनी केले.

राज्यात 38,500 गावांचे जमीन सुपिकता निर्देशांक तयार करण्यात आले असून ते कृषी विभागाच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहे. हे निर्देशांक प्रत्येक गावात मोठ्या फलकावर लावण्यात यावेत असे भुसे यांनी सांगितले. हे सुपिकता निर्देशांक तयार करताना त्या त्या गावातील प्रमुख पाच पिकांचा त्यात खरीप 3  आणि रब्बी 2 असा समावेश करण्यात आला आहे.       

राज्यात गेल्या पाच वर्षात 57 लाख माती परीक्षण नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून 2 कोटी 64 लाख माती आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. माती परीक्षण नमुन्यांमुळे रासायनिक खतांच्या वापरात 8 ते 10 टक्क्यांनी घट आली असून पिक उत्पादनात 5 ते 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

38 हजार 500 गावांचे जमीन सुपिकता निर्देशांक तयार करताना 4 घटकांवर आधारित एका गावाचे बारा वेगवेगळ्या प्रकारचे निर्देशांक तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा विचार करण्यात आला आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !