प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षकावर कारवाई होण्यासाठी उपोषण
अहमदनगर - शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षकांनी बोगस चारित्र्य पडताळणीचे कागदपत्र देऊन नोकरी मिळवली आहे, असा आरोप करुन तातडीने त्यांना बडतर्फ करुन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजसर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात तक्रारदार संकेत कळकुंबे व मिनाक्षी कळकुंबे यांनी उपोषण केले.
या उपोषणाला जय भगवान महासंघ व रिपब्लिकन पार्टीच्या (गवई गट) वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी जय भगवान महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सानप, प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे, जिल्हाध्यक्ष रमेश सानप, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, संतोष पाडळे, पोलीस बॉईज असोसिएशनचे नितीन खंडागळे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सोनू शिंदे, हरीभाऊ डोळसे, कैलास गर्जे, मदन पालवे, प्रविण नाईक, अल्ताफ शेख, पवन भिंगारदिवे आदि सहभागी झाले होते.
शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षक पवनसिंग बिघोत यांनी शासनापासून खरी माहिती लपवून स्वतःची बोगस चारित्र्य पडताळणी करून घेतलेली आहे. पुरवठा निरीक्षक पदावर रुजू होण्यापूर्वी बिघोत यांच्यावर 17 सप्टेंबर 2016 रोजी पोलीस तोतयागिरी प्रकरणी सिडको (जि. औरंगाबाद) गुन्हा दाखल झालेला आहे.
या व्यक्तीला वेळोवेळी सरकारी सेवेतून बडतर्फ करण्याकरिता तहसीलदार शेवगाव ते मुख्यमंत्री मंत्रालय स्तरावर गेल्या सहा महिन्यापासून पाठपुरावा करण्यात आलेला आहे. बिघोत यांच्यावर बडतर्फ करण्याची कारवाईचा आदेश विभागीय आयुक्त साहेब यांनी देऊन सुद्धा या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
ही व्यक्ती कारवाईपासून वाचण्यासाठी पैशाचे आमिष व मारहाण करण्याचे धमक्या इतर व्यक्तीमार्फत देत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर स्वरूपाचा असून, बिघोत यांनी शासनाची फसवणुक केलेली आहे. शेवगाव येथील शासकीय कर्मचारी त्यांना या प्रकरणातून वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणी बिघोत यांना सरकारी सेवेतून कायम बडतर्फ करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तरी जिल्हा प्रशासनाने ही गंभीर बाब लक्षात घेऊन विभागीय आयुक्तांनी बिघोत यांना बडतर्फ करण्याचा आदेश दिलेला असताना त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बोगस चारित्र्य पडताळणीद्वारे सरकारी सेवेत दाखल झालेले शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षक पवनसिंग बिघोत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांना सेवेतून कायमस्वरुपी बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षकांनी केलेला प्रकार हा गंभीर आहे. फसवेगिरी करणार्यांवर उचित कारवाई करण्याची गरज असून, जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सदर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधीतांवर कारवाई करावी. अन्यथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार आहे. - आनंद लहामगे (प्रदेश उपाध्यक्ष, जय भगवान महासंघ)