मुंबई : बियर बारमध्ये जाणाऱ्या ग्राहकांची नशा उतरवणारी घटना मुंबईत घडली आहे. बियर बारमध्ये कॅशियर आणि दोन वेटर ग्राहकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचं क्लोनिंग करून त्यांच्या बँक अकाऊंटमधून पैसे काढत असताना सापडले आहेत.
मुंबईतील मालाड पोलिसांनी तीन बियर बारमधील एका कॅशियरसोबतच 2 वेटर यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 क्लोनिंग मशीनसोबतच लॅपटॉप, ATM कार्ड आणि ग्राहकांचे ATM पिन नंबर लिहिलेले कागद हस्तगत केले आहेत.
पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. मालाड (प ) चिंचोली बंदरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने तक्रार दाखल केल्यावर ही कारवाई करण्यात आली.
संबंधित तक्रारदाराच्या खात्यातून ATM न वापरताही पैसे कट होत होते. त्याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर, बियरबारमध्ये सुरु असलेला हा सावळा गोंधळ समीर आला.
ही काळजी घ्या
सार्वजनिक ठिकाणी कार्डचा वापर करताना कॅमेऱ्याद्वारे कोणी तुमची माहिती चोरण्याचा प्रयत्न करत नाही ना, याची काळजी घ्या. स्वपिंग मशिनींमध्ये कार्डचा पिन टाकताना आपल्या हाताने मशीन झाकण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही एखाद्या हॉटेल, पेट्रोल पंप किंवा इतर ठिकाणी स्वपिंग मशिनद्वारे कार्ड स्वाईप करत असाल आणि मशीन जर जास्त वजनाची लागत असेल तर तातडीने त्याची तपासणी करा. कार्डने पेमेंट केल्यानंतर तुम्हाला मोबाइल फोनवर व्यवहार केल्याचा मेसेज नाही आला तर तात्काळ बँकेशी संपर्क साधा. याशिवाय बँकेतून येणारा प्रत्येक मेसेज काळजीपूर्वक वाचा आणि तो तपासा. यासंबंधीची अधिक माहिती तुम्ही बँक स्टेटमेंटमधूनही घेऊ शकता.