पुणे : सध्या देशात राजकीय नेते मंडळींना सक्त वसुली संचालनालया (ईडी) ची नोटीस आली, त्यांच्यावर कारवाई केली, चौकशी केली अशा बातम्या सर्वत्र ऐकायला, वाचायला मिळतात. मात्र ज्या ईडीच्या कारवाईची 'ब्रेकिंग न्यूज' होते त्या ईडीलाच नोटीस आली तर? होय, झेरॉक्स चे पैसे द्यावेत या मागणीसाठी थेट 'ईडी'लाच २५ जानेवारी रोजी नोटीस पाठवील्याची माहिती पुण्यातील ऍड.असीम सरोदे (मानवी हक्क आयोगाचे वकील) यांनी 'एमबीपी लाईव्ह २४' ला दिली.
त्याचे झाले असे, भोसरीतील भूखंड घोटाळ्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तक्रार दिली असून या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. दमानिया यांच्या वतीने ऍड. असीम सरोदे बाजू मांडत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची काही कागदपत्रे हवे असल्याने ईडीचे सहायक संचालक राजेश कुमार यांनी २९ डिसेंबर २०२० रोजी ऍड. सरोदे यांना फोन केला होता. तसेच ईडीच्या कार्यालयानेही याबाबत ई-मेल पाठविला होता. त्यानुसार ईडी कार्यालयातील कर्मचारी ऍड. सरोदे यांच्या कार्यालयात आला. मात्र त्याने कागदपत्रे नेली नाहीत. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याने मी कागदपत्रे नेऊ शकत नसल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने ऍड. सरोदे यांना सांगितले, असे ऍड. सरोदे यांनी स्पष्ट केले आहे.
घडल्या प्रकाराबाबत ऍड. सरोदे यांनी ईडीला नोटीस पाठून नाराजी व्यक्त केली होती. ईडी हि नामवंत संस्था असून त्यांनी अनधिकृत व्यक्तीकडून कागदपत्रे मिळविणे अयोग्य आहे. शिवाय या कागदपत्रांच्या झेरॉक्स काढण्यासाठी आलेला खर्चही त्यांनी दिला नाही, हे विशेष. त्यामुळे यासाठी आलेला खर्च १ हजार ३४० रुपये आणि नोटिशीचा खर्च १०० रुपये असे एकूण १ हजार ४४० रुपये ईडीने द्यावेत यासाठी ऍड. सरोदे यांनी ईडीला नोटीस पाठविली आहे.