'असुरण' हा सिनेमा म्हणजे भांडवलशाही आणि जाती व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या शिवसामीच्या संघर्षाची कहाणी आहे. तमिळ चित्रपटसृष्टी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये नवीन कथानक, एक्शन, चित्रीकरणासाठी प्रसिद्ध आहे.
समाज जेव्हा नृत्य, संगीत, नशा, चंगळवाद आणि धार्मिकतेच्या उन्मादात वावरत असतो, तेव्हा एखादा असा सिनेमा येऊन समाजाच्या डोळ्यातील झोप उडवून आत्मभान देतो.
‘व्हाय धिस कोलावरी डी’ या गाण्याच्या माध्यमातून कोट्यवधी भारतीयांच्या घराघरात गेलेला धनुष, त्याने निर्मिती केलेल्या ‘काला’ चित्रपटाने तर मुंबईतील धारावी मध्ये कष्टकरी, श्रमीक आणि तथाकथीत अस्पृश्यांच्या वेदनेला वाचा फोडली होती.
सुपरस्टार रजनीकांत आणि नाना पाटेकर यांच्या तगड्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने देशातील जातीय उतरंड, डाव्या आणि पुरोगामी चळवळीचा लढा, भांडवलशाही विरूद्धचा गरीबांचा रक्तरंजीत संघर्ष अंगावर रोमांच उभे करतो.
सांडपाण्यामुळे काळ्यापाण्याने तुडुंब वाहणारी मिठी नदी, नाले आणि गटारी, कष्टाने, घामाने काळवंडलेल्या चेहऱ्यांच्या काळ्या रंगाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ‘काला’ या चित्रपटाचा आशय सामाजिक समतेचा होता.
अगदी त्याच धाटणीचा जमीनदार, भांडवलशाही विरुद्ध अस्पृश्य अल्प भूधारकांचा संघर्ष ‘असुरण’ चित्रपट. समाजातील जातवास्तव, धनदांडग्यांचा उन्माद, अस्पृश्यांचा रक्तरंजीत लढा आणि भ्रष्ट पोलिसयंत्रणेचे अंगावर काटा आणणारे वास्तवदर्शी चित्रण म्हणजे असुरण.
राष्ट्रीय पुरस्कार मिळावा या दर्जाचे कथानक, चित्रीकरण आणि सर्वच कलाकारांचा तगडा अभिनय त्यामुळे सुमारे दोन तास प्रेक्षक खिळून राहतो.
धनुष हा अंगकाठीने किरकोळ बांधाचा कलाकार, त्याला हिरो म्हणून बॉलीवुडमध्ये घेण्याची सुतराम शक्यता नाही. परंतु त्याचा तगडा अभिनय, मुद्राभिनय, गरीबीमुळे आलेली अगतिकता, कुटुंबासाठी रक्ताची रंगपंचमी खेळणारा बाप, मुलगा आणि भाऊ त्याने जबरदस्त साकारला आहे.
मुळात असुण हा चित्रपट 'पुमणी' लिखीत 'वेक्कई' या कांदबरीवर आधारीत आहे. कुटुंबप्रमुख म्हणून एखादा बाप जर संपूर्ण गाववाल्यांच्या पायाशी लोळण घेऊ शकतो, तर संपूर्ण गाववाल्यांच्या विरोधात जाऊन मुडद्यांची रास पाडायला पण मागेपुढे पाहत नाही, अशा ‘शिवसामी’ (धनुष)ची संघर्षकथा.
तब्बल १६०० एकर जागेचा जमीनदार लगतच्या शिवसामीच्या बायकोच्या नावावरील ३ एकर जमिनीसाठी कुटुंबाला त्रास द्यायला सुरू करतो. शिवसामीचा आक्रमक मुलगा वेदकुरण (आदुलाम नरेन) हा जमीनदाराच्या मुलासह बापाला कानफटात मारत जमीन वाचविण्यासाठी उभा राहतो.
परंतु जमीनदार सुपारी देऊन त्याची निघृण हत्या केली जाते. त्याचा मृतदेह अक्षरश: कुत्रे आणि गिधाडांना खाऊ घातले जाते. त्याचे धड नसल्यामुळे पोलिस त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी देण्यासाठी नकार देतात. मोठ्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी १५ वर्षाचा वेलमुरूगन (टी जय) बाँब तयार करून जमीनदाराचा खून करतो.
त्यानंतर शिवसामी (धनुष), त्याची पत्नी (मंजू वॉरीअर), मुलगी हे जंगलात पलायन करतात. जंगलातील ड्रोन कॅमेऱ्यातून केलेले चित्रीकरण जबरदस्त आणि पाहण्यासारखं आहे. या प्रवासादरम्यान धनुषचा मुलगा कुटुंब सांभाळू शकत नसल्याबद्दल खिजवतो..
तेव्हा 'फ्लॅशबॅक'मध्ये धनुष त्याला ‘तो नेमका कोण कोठून आला क्रोधामुळे कुटुंब कसे गमावले’या बद्दलची कहाणी सांगतो. हा चित्रपट पाहील्यावर फ्लॅशबॅकची मजा आहे.
फ्लॅशबॅकनंतर प्रकाश राज जो व्यवसायाने वकिल परंतु पूर्ण वेळ आदिवासी, दलितांच्या चळवळीचा नेता त्याला धनुष भेटून मध्यस्थी करून पंचायतीसमक्ष जमिनदाराला जमीन विकून स्वत:चे कुटुंब वाचविण्याची विनंती करतो.
पंचांसमोर जमीनदाराची मुले जमीन खरेदी करून घेतात. त्यानंतर करार मोडत धनुषच्या लहान मुलाला भर चौकात हत्या करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी धनुष असुरण बनून त्याचे कुटुंब वाचवितो. रक्तरंजीत संघर्षानंतर न्यायालयापुढे शरण जातो.
मुलाला तो अखेरचा संदेश देतो की ‘तु जमिन खरेदी केली की जमीनदार तुझी जमीन विकत घेणार, तु पैसे कमावले तर ते हिसकावून घेणार. पण तु जर शिक्षण घेऊन ताकदवर व्यक्ती बनला तर ते तुझं ज्ञान हिसकावून घेऊ शकत नाही.’
प्रत्येक माणसाला समाजातील जातीव्यवस्थेची चीड आहे. भांडवलशाही पोलिस व न्याय यंत्रणेचा गैरवापर करत गरीबांना कशी दडपशाही आणि दमन करते, याचे जबरदस्त चित्रण असुरण या चित्रपटात झाले आहे.
यू ट्युबच्या समुद्रात हा चित्रपट काही काळानंतर लुप्त होऊन जाऊ नये, जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहावा यासाठी हा लेखप्रपंच.
- यशपाल सोनकांबळे
रिलीज तारीख - ४/१०/२०१९
कलाकार - धनुष, मंजु वॉरीअर, प्रकाश राज, पशुपती, पवन, टी जय, आदुकलाम नरेन, केन करुणास, अभिरामी.
दिग्दर्शक - वेत्रीमारण
वेळ - २ तास