अहमदनगर - जिल्ह्यात व लगतच्या जिल्ह्यामध्ये कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक आदेशांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. रात्री ८ नंतर जमावबंदी आदेश लागू झाला आहे.
दि. १५ एप्रिलपर्यंत रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हा जमावबंदी आदेश लागू केला आहे.
सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील. रात्री ८ ते सकाळी ७ दरम्यान ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास प्रति व्यक्ती रु. १ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या फिरण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ या कालावधीत निर्बध असणार आहेत. रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत सर्व सार्वजनिक ठिकाणे (उद्याने, बागा इ.) बंद राहतील.
कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा यादी करुन शोध घेणे, त्यांना अलग ठेवणे व १४ दिवस संपर्कात राहणे. ८०% संपर्कातील व्यक्तींचा ७२ तासांच्या आत शोध घेतला जात आहे.
विनामास्क आढळलेल्या व्यक्तीला ५०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुकताना आढळलेल्या व्यक्तीस १ हजार रुपये दंड आकारला जाईल, असे आदेशात म्हटलेले आहे.
सर्व सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स, प्रेक्षागृह, मॉल्स, हॉटेल्स , रेस्टॉरंटस् हे रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत बंद राहतील. परंतु हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, यांना घरपोच सेवा व पार्सल सुविधा देण्यास मान्यता आहे.
आदेशाचे उल्लंघन झाल्यास, संबंधित सिनेमा हॉल्स, प्रेक्षागृह, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटस् हे केंद्र शासनाव्दारे कोविड-१९ साथरोग आपत्ती जाहीर केलेल्या कालावधीपर्यंत बंद करण्यात येतील. उल्लंघन करणाऱ्या ठिकाणचे मालकाला आपत्ती कायद्मातंर्गत दंड केला जाईल.
सर्व सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय, धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास, प्रेक्षागृह, नाट्यगृहे यांचा वापर करण्यास मनाई आहे. याचे उल्लंघन झाल्यास संबंधित ठिकाणचे मालकास आपत्ती कायद्यांतर्गत दंड केला जाईल. तसेच ही मालमत्ता बंद करण्यात येईल.
लग्न समारंभासाठी 'ही' अट
मंगल कार्यालय, लॉन्स, मॅरेज हॉल व लग्न समारंभाचे ठिकाणी लग्न समारंभासाठी आलेले व-हाडी, पाहुणे मंडळी, मंगल कार्यालयातील कर्मचारी, आचारी व इतर उपस्थित सर्व व्यक्ती मिळून ५० व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल, असेही आदेशात म्हटले आहे.