नवी दिल्ली - केंद्र सरकारने नागरिकांच्या आधार क्रमांकाला पॅन क्रमांक जोडण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आयकर विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवरून ही माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता, पॅन क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्यासाठी दिवसभर रांगेत उभ्या राहिलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
'इन्कम टॅक्स इंडिया' या ट्विटर हॅन्डलवरून ही माहिती देण्यात आली आहे. कोविड १९ संक्रमणाच्या दरम्यान नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी पाहता आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी मुदत वाढविली आहे.
यापूर्वी ३१ मार्च २०२१ ही अखेरची तारिख होती. तर १ एप्रिलपासून लिंक न केलेले पॅन क्रमांक बाद होणार होते. त्यामुळे आता ३० जून २०२१ पर्यंत नागरिकांना कोणत्याही शुल्काशिवाय किंवा दंडाशिवाय आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडता येईल.
यापूर्वी उशिराने लिंकिंग केले तर एक हजार रुपये दंड आकारला जाणार होता. त्यामुळे आज अखेरच्या दिवशी अनेक लाेक इंटरनेट कॅफेच्या बाहेर आधार आणि पॅन कार्ड हातात घेऊन रांगेत उभे असल्याचे चित्र दिसून येत होते. परंतु, आता नागरिकांना घाबरण्याचे काहीच कारण नाही.
येथे क्लिक करुन आधीची बातमी वाचा
मात्र, आता मुदतवाढ मिळालेल्या कालावधीत नागरिकांनी आपापल्या सोयीनुसार दोन्ही कार्ड एकमेकांना लिंक करुन घ्यावेत, अन्यथा पुन्हा त्यांना त्रासाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आलेला आहे.