अहमदनगर - शहरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात रविवारी २७ महिलांनी एक आगळावेगळा संकल्प करीत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे हा आदर्श ठेवण्याची सुरुवात महिलांनी केल्यामुळे या उपक्रमाची पंचक्रोशीत चांगली चर्चा होत आहे. या महिलांचे विशेष कौतुक होत आहे.
नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिर येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २३८ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी या शिबिराला उपस्थित असलेल्या २७ ज्येष्ठ महिलांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आहे.
या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद््घाटन मुळा पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते झाले, तर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
संत सावता महाराज मंदिर येथे हे शिबीर पार पडले. यात २३८ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. डॉ. ओमकार वाघमारे, किरण कवडे यांनी रुग्णांची तपासणी केली. ६२ गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी गरजूंना मोफत नंबरचे चष्मे वितरीत करण्यात आले.
सूत्रसंचालन राजेंद्र बोरुडे यांनी केले. आभार गौरव बोरुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जालिंदर बोरुडे, किशोर गांगर्डे, बाबासाहेब धीवर, सौरभ बोरुडे, ओम बोरुडे, सागर बनकर, प्रभाकर धाडगे, मोहनीराज कुर्हे, सुदाम वाबळे, अर्जुन कराळे, साई धाडगे आदींनी परिश्रम घेतले.
महिला शिकल्यानेच आज सर्व क्षेत्रात कर्तृत्व सिध्द करीत आहेत. महिला सक्षमीकरणाचे खरे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले, शेतकरी व बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून महात्मा फुलेंनी पुरोगामी विचारांची मांडणी केली व ते प्रश्न सोडवण्याचे कार्य केले, असे मत मुळा पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी व्यक्त केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पाळन करुन हे शिबीर घेण्यात आले. नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. सावित्रीबाई फुलेंमुळे महिलांना प्रतिष्ठा - देशात स्त्रीला सन्मान व प्रतिष्ठा सावित्रीबाईंच्या स्त्री शिक्षण चळवळीने मिळाली.