मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे यावर्षी 'शब-ए-बारात' अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गृह विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
शब-ए-बारात निमित्त सर्व मुस्लीम धर्मीय बांधव आपआपल्या विभागातील मशिदीत रात्रभर नमाज, कुराण व दुवा पठण करतात. त्यामुळे बहुसंख्य मुस्लीम वस्तीत रात्रभर वर्दळ असते. तसेच काही ठिकाणी वाझ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी दि.२८ मार्च रोजीची रात्र व दि. २९ मार्च, २०२१ ची पहाट या कालावधीत (चंद्रदर्शनावर अवलंबून) येणाऱ्या शब-ए-बारात या उत्सवा निमित्त मिरवणुकांचे आयोजन न करता मशिदीत अथवा घरातच दुवा पठण करणे उचित ठरेल.
शब-ए-बारात निमित्त स्थानिक मशिदीत नमाज पठणाकरीता येणाऱ्या मुस्लीम बांधवांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता एका वेळी ४० ते ५० व्यक्तींनी टप्प्या-टप्प्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व मास्कचा वापर करून दुवा पठण करावे.
मशिदीतील व्यवस्थापक यांनी मशिद व आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इ.) चे पालन होईल याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
शब-ए-बारात दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या वाझ या कार्यक्रमाचे आयोजन शक्यतो बंदिस्त जागेत करावे. परंतु खुल्या जागेत आयोजन केल्यास कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही व त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी.
कोविड-१९ च्या अनुषंगाने मुंबईमध्ये लागू असलेल्या फौजदारी दं.प्र.सं. कलम १४४ अन्वये जारी केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. वाझ कार्यक्रमाचे आयोजक यांनी कार्यक्रमाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करून द्यावी.
कोविड-१९ च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.