नेत्रदानाचे महत्त्व, प्रक्रिया आणि समज गैरसमज (विशेष मुलाखत: नेत्रतज्ज्ञ डॉ. अशिषकुमार इंगळे)


मानवी शरीरातील सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र दान म्हणजे नेत्रदान. मृत्यूनंतर आपले डोळे एखाद्या अंध व्यक्तीला नवीन दृष्टी देऊ शकतात. बुबुळाच्या दोषांमुळे (Corneal Blindness) दृष्टी गमावलेल्या रुग्णांसाठी नेत्रदान म्हणजे पुनर्जन्मच ठरतो. नेत्रदानाची ही संपूर्ण वैद्यकीय प्रक्रिया कशी चालते, कोण पात्र असते आणि लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी नेत्रतज्ज्ञ डॉ. अशिषकुमार इंगळे यांच्याशी केलेली सविस्तर चर्चा खालीलप्रमाणे आहे.


Q. नेत्रदान म्हणजे काय? त्याची वैद्यकीय प्रक्रिया कशी असते?
  • नेत्रदान हे वैद्यकीय क्षेत्रातील आणि मानवतेच्या दृष्टीने सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र दान मानले जाते.
  • व्यक्तीच्या मृत्युनंतर तिचे डोळे इतर अंध व्यक्तींना दृष्टी देण्याकरिता वापरले जातात. हजारो लोक कॉर्नियल ब्लाइंडनेस (Corneal Blindness), म्हणजेच बुबुळाच्या दोषांमुळे येणारे अंधत्व यामुळे दृष्टी गमावतात. नेत्रदानामुळे त्यांना नवीन दृष्टी मिळू शकते. एका व्यक्तीच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना, ज्यांना बुबुळाच्या दोषामुळे अंधत्त्व आले आहे, अशांना दृष्टी मिळू शकते.
  • नेत्रदानाची वैद्यकीय प्रक्रिया (Medical Procedure) ही अतिशय सोपी, सुरक्षित आणि जलद असते. मृत्युनंतर नेत्रपेढीचे (Eye Bank) तज्ज्ञ डॉक्टर घरी किंवा रुग्णालयात येऊन ही प्रक्रिया पूर्ण करतात.
  • मृत व्यक्तीने आधी नोंद केली असेल किंवा नसेल, तरी मृत्युनंतर नातेवाईकांची लेखी संमती (Written Consent) आवश्यक असते.
  • डॉक्टरांची टीम, मृत व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास (Medical History) आणि मृत्युची वेळ तपासते. तसेच कोणताही संसर्गजन्य आजार (Infectious Disease) नाही ना, हे तपासण्यासाठी मृत व्यक्तीचा रक्ताचा नमुना घेतला जातो.
  • प्रत्यक्ष डोळा काढण्याची प्रक्रिया मृत्युनंतर ४ ते ६ तासांच्या आत केली जाते.
  • संपूर्ण प्रक्रियेला १५ ते २० मिनिटे लागतात.
  • डॉक्टर संपूर्ण डोळा काढत नाहीत, बहुतेक वेळा डोळ्याचा फक्त बुबुळ (समोरील पारदर्शक भाग - Cornea) काढून घेतात.
  • बुबुळ किंवा डोळा काढल्यानंतर त्या ठिकाणी कृत्रिम प्लास्टिक कॅप किंवा प्रोस्थेटिक डोळा (Prosthetic Eye) लावला जातो; त्यामुळे डोळे नैसर्गिक वाटतात आणि मृत व्यक्तीचा चेहरा अजिबात विद्रूप दिसत नाही.
  • काढलेला डोळा किंवा बुबुळ एका विशेष द्रव पदार्थात (Preservation Medium) ठेवून नेत्रपेढीमध्ये (Eye Bank) आणले जाते.
  • नेत्रपेढीमध्ये, अत्याधुनिक उपकरणांद्वारे (Specular Biomicroscope) बुबुळातील पेशींची संख्या (Endothelial cell count) आणि पारदर्शकता तपासली जाते.
  • हा डोळा किंवा बुबुळ ठराविक तापमानाला ४ ते १४ दिवसांपर्यंत साठवून ठेवता येतो.
  • नेत्रपेढीतील प्रतीक्षा यादीनुसार (Waiting List) गरजू अंध व्यक्तीला तातडीने बोलावले जाते. अशा गरजू अंध व्यक्तीचे खराब झालेले बुबुळ काढून त्याजागी दान केलेले निरोगी बुबुळ शस्त्रक्रियेद्वारे (Surgery) बसवले जाते.

Q. नेत्रदानासाठी कोण पात्र असतात? वयाच्या अटी काय? कोणत्या परिस्थितीत नेत्रदान स्वीकारले जात नाही?
  • चष्मा असलेले (किंवा नसलेले), मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब (Diabetes, Hypertension), असे सर्व वयोगटातील सर्व जाती-धर्माचे सर्व लोक नेत्रदान करू शकतात. वयाची कुठलीही अट नाही.
  • संसर्गजन्य रोग जसे सेप्टीसेमिया (Septicemia), एड्स (HIV), हिपॅटायटिस बी किंवा सी (Hepatitis B or C), रेबीज (Rabies), रक्ताचा कर्करोग (Leukemia), धनुर्वात (Tetanus), इत्यादी आजारांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे घेतले जात नाहीत.

Q. मृत्युनंतर नेत्रदान करण्याची योग्य वेळ किती? संपूर्ण प्रक्रिया कशी पार पडते?
  • आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्युनंतर नातेवाईकांची संमती असल्यास नातेवाईकांनी त्वरित जवळच्या अधिकृत नेत्रपेढीशी (Eye Bank) किंवा १०४ या हेल्पलाईनवर (Helpline) संपर्क साधावा.
  • मृत व्यक्तीच्या नेत्रदानाची संपूर्ण प्रक्रिया मृत्युनंतर ४ ते ६ तासांमध्ये पार पाडणे आवश्यक असते.
  • मृत व्यक्तीचे डोळे बंद करून त्यांच्यावर ओला कापूस किंवा ओले कापड ठेवावे. खोलीतील पंखा बंद ठेवावा. एसी (AC) असल्यास तो सुरू ठेवावा. बुबुळ सुकणार नाही याची काळजी घ्यावी.

Q. नेत्रदानानंतर मिळालेल्या डोळ्यांचा वापर कोणत्या शस्त्रक्रिया किंवा उपचारांसाठी केला जातो? रुग्णांना दृश्यशक्ती मिळवण्यात किती यश मिळते?
  • नेत्रदानानंतर मिळालेल्या डोळ्यांचा वापर प्रामुख्याने बुबुळांतील दोषांमुळे आलेल्या अंधत्वावर (Corneal Blindness) मात करण्यासाठी केला जातो.
  • पेनेट्रेटींग केराटोप्लास्टी (Penetrating Keratoplasty / Full-thickness): यामध्ये रुग्णाचा संपूर्ण खराब झालेला कॉर्निया (बुबुळ) काढून त्याजागी दान केलेले बुबुळ बसवले जाते.
  • लॅमेलार केराटोप्लास्टी (Lamellar Keratoplasty / Partial-thickness): या आधुनिक पद्धतीमध्ये संपूर्ण बुबुळ न बदलता, बुबुळाचा फक्त खराब झालेला भाग/थर बदलला जातो. यामुळे दान करण्यात आलेल्या एकाच बुबुळाचे एकापेक्षा जास्त भाग करून अनेक (उदा. ३) रुग्णांवर उपचार करण्यात येतात.
  • केराटोकोनस (Keratoconus): या आजारात बुबुळाचा बहिर्वक्र आकार बदलून तो शंकूसारखा होतो व दृष्टी अंधुक होते.
  • कॉर्नियल स्कारिंग (Corneal Scarring) - टीक डाग / फुल पडणे: संसर्ग (Infection), अपघात, किंवा रासायनिक दुखापतीमुळे (Chemical Injury) बुबुळ पांढरे पडले असल्यास दान केलेले बुबुळ बसवून दृष्टी पुन्हा मिळवता येते.
  • जे डोळे / बुबुळ प्रत्यारोपणासाठी उपयुक्त नसतात त्यांचा वापर वैद्यकीय विद्यार्थी किंवा संशोधक (Researchers) डोळ्यांच्या आजारांवरील नवीन उपचार किंवा औषधे शोधण्यासाठी करतात.
  • मानवी शरीरातील इतर अवयव प्रत्यारोपणाच्या तुलनेत, बुबुळ प्रत्यारोपणाच्या (Corneal Transplant) शस्त्रक्रियेच्या यशाचा दर सर्वाधिक आहे. सामान्य प्रकरणांमध्ये पहिल्या वर्षापर्यंत ९५% पर्यंत प्रत्यारोपणे यशस्वी होतात. तसेच योग्य काळजी घेतल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू ठेवल्यास सुमारे ७५% प्रत्यारोपण वर्षानंतर तसेच सुमारे ६०% प्रत्यारोपण १० वर्षानंतर यशस्वी राहतात.

Q. नेत्रदानाबाबत गैरसमज, भीती व अंधश्रद्धा काय आहेत?
  • अनेक लोक असे मानतात, की या जन्मात डोळे दान केले की पुढील जन्मात ती व्यक्ती अंध म्हणून जन्माला येईल: वास्तविकतः, हा एक भ्रामक समज आहे. कोणत्याही धर्मात किंवा ग्रंथात असा उल्लेख नाही. उलट, जगातील सर्व प्रमुख धर्म, दुसऱ्याला दृष्टी देण्याला सर्वात मोठे पुण्यकर्म मानतात. आपण दान केलेले डोळे दुसऱ्या व्यक्तीच्या रूपात जिवंत राहतात.
  • वृद्ध व्यक्ती, चष्मा असलेले किंवा डोळ्यांची शस्त्रक्रिया झालेले लोक नेत्रदान करू शकत नाहीत: परंतु, नेत्रदानासाठी वयोमर्यादा (Age Limit) नसते.
  • मोतीबिंदू शस्त्रक्रिया : मोतीबिंदू शस्त्रक्रिया (Cataract Surgery) झालेल्या डोळ्यांचे देखील नेत्रदान करता येते. नेत्रदान करून डोळ्यांच्या बुबुळांचा वापर करून कॉर्नियल ब्लाइंडनेस (Corneal Blindness) दूर करता येते. परंतु मोतीबिंदू शस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात आलेल्या लेन्सचा (Intraocular Lens - IOL) पुनर्वापर नेत्रदानादरम्यान करता येत नाही.
  • जिवंतपणी डोळे काढले जातील अशी भीती: काही लोकांना अशी भीती होती की, नेत्रदानाचा फॉर्म भरला की जिवंतपणीच डोळे काढले जातील. परंतु नेत्रदान हे केवळ व्यक्तींच्या मृत्युनंतरच केले जाते.
  • वेळ आणि अंत्यविधीस उशीर होण्याचा गैरसमज: नेत्रदानासाठी डोळे काढण्यास खूप वेळ लागेल, असा गैरसमज आणि अंत्यविधीस (Funeral) खूप उशीर होईल, असा गैरसमज आहे, परंतु प्रत्यक्षात ही प्रक्रिया केवळ १५ ते २० मिनिटांमध्येच पूर्ण होते.
  • केवळ फॉर्म भरून नेत्रदान होते का? केवळ फॉर्म भरून नेत्रदान होत नाही. मृत्युनंतर कुटुंबाची कायदेशीर संमती (Legal Consent) आवश्यक असते.

Q. नेत्रदानासाठी नोंदणी कुठे आणि कशी? मृत्युनंतर परवानगी देण्याचा अधिकार कोणाकडे?
  • जिवंत असताना पुढील पर्यायांद्वारे नेत्रदानाचा संकल्प करता येतो:
  • जवळची नेत्रपेढी किंवा नेत्र रुग्णालय (मान्यताप्राप्त सरकारी किंवा खाजगी रुग्णालयाची नेत्रपेढी) येथे नेत्रदान अर्ज भरता येतो.
  • आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया (EBAI) यांच्या संकेतस्थळावर (Website) ऑनलाइन फॉर्म भरता येतो.
  • नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (NOTTO) या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करता येते.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर नेत्रदाता कार्ड (Donor Card) मिळते, जे नेहमी स्वतःसोबत बाळगणे आवश्यक असते.
  • केवळ फॉर्म भरून किंवा डोनर कार्ड मिळवून नेत्रदान होत नाही. आपण घेतलेल्या नेत्रदानाच्या निर्णयाची कल्पना आपल्या कुटुंबाला देणे आवश्यक असते. कारण मृत्यूनंतर नेत्रपेढीला कळवण्याचे काम कुटुंबाचेच असते, कुटुंबातील जवळच्या व्यक्तीची लेखी संमती (Written Consent) नेत्रदानासाठी अनिवार्य असते.
  • मृत व्यक्तीची जवळची व्यक्ती / नातेवाईक - जसे की पती / पत्नी, मुलगा / मुलगी, आई / वडील, भाऊ / बहीण, किंवा कायदेशीर पालक (Legal Guardian), यांपैकी कोणालाही नेत्रदानासाठी संमती देण्याचा अधिकार असतो.
  • तसेच मृत व्यक्तीने जिवंतपणी नोंदणी केलेली नसेल, तरीही त्याच्या मृत्युनंतर कुटुंबातील जवळचे सदस्य नेत्रदानाची संमती देऊ शकतात.

Q. भारतातील नेत्रदानाची गरज आणि मागणी-पुरवठ्यातील तफावत किती आहे?
  • भारतात दरवर्षी साधारणतः दोन ते अडीच लाख बुबुळांची आवश्यकता असते.
  • सध्या देशात बुबुळाच्या दोषांमुळे येणाऱ्या अंधत्व (Corneal Blindness) असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे बारा लाख आहे.
  • प्रत्यक्षात मात्र, देशभरात, दरवर्षी साधारणतः ४०,००० ते ५०,००० डोळे संकलित केले जातात. यांपैकी साधारणतः ३०,००० ते ३५,००० बुबुळ प्रत्यारोपणासाठी उपयुक्त ठरतात.
  • आकडेवारीनुसार ही तफावत (Gap) पाच पटीपेक्षा जास्त आहे.
  • ही तफावत दूर करण्यासाठी, सध्याचे नेत्रदानाचे प्रमाण साधारणतः पुढील १० पटीने वाढवण्याची गरज आहे.

Q. जनजागृतीसाठी व समाजातील सहभाग वाढवण्यासाठी सर्वसामान्यांनी कोणती पावले उचलावीत आणि याबाबत आपला संदेश?
  • स्वतः संकल्प करा
  • कुटुंबीयांशी चर्चा करा
  • गैरसमज दूर करा
  • माहितीचे (साहित्याचे) दूत बना
  • संदेश: मृत्युनंतरही इतरांच्या आयुष्यात दृष्टीरुपी प्रकाश आणणे, हेच श्रेष्ठदान आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !