येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - बदलत्या काळानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान (Modern Technology), महागडे कॅमेरे आणि उपकरणांवर होणारा मोठा खर्च लक्षात घेता राहाता तालुक्यातील फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशनने व्यवसायाच्या दृष्टीने काही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ठोस निर्णय घेतले आहेत.
हॉटेल केबीएस ग्रँड येथे पार पडलेल्या बैठकीत वाढता खर्च, वेळेचे बंधन आणि पेमेंट पॉलिसीबाबत नियमावली निश्चित करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संदीप वाव्हळ यांनी स्पष्ट केले की, दरवर्षी बाजारात येणारे लाखो रुपयांचे अत्याधुनिक कॅमेरे, लेन्स, ड्रोन (Drone), लाईटिंग आणि संगणकीय स्टोरेजवर मोठी गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे या व्यवसायात टिकून राहण्यासाठी आणि योग्य मोबदला मिळण्यासाठी नियमावली आवश्यक झाली आहे.
बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय :
- कामाच्या वेळेवर बंधन (Time Limit): लग्न, साखरपुडा, वाढदिवस किंवा धार्मिक कार्यक्रमांसाठी फोटोग्राफी-व्हिडिओग्राफीची सेवा घेताना वेळेचे बंधन निश्चित केले जाईल. ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काम असल्यास ग्राहकांना प्रति तास अतिरिक्त शुल्क (Extra Charges) द्यावे लागेल.
- अल्बम व डाटाची २ महिन्यांची मुदत (Data Retention Policy): कार्यक्रमाचा अल्बम आणि फोटो-व्हिडिओचा सर्व डाटा ग्राहकांनी २ महिन्यांच्या आत घेऊन जाणे अनिवार्य असेल. २ महिन्यांनंतर संबंधित डाटाची कोणतीही जबाबदारी फोटोग्राफरची राहणार नाही.
पेमेंट पॉलिसी (Payment Structure):
- ६०% ॲडव्हान्स (Advance Payment): ऑर्डर बुक करताना एकूण रकमेच्या ६० टक्के रक्कम ॲडव्हान्स म्हणून द्यावी लागेल.
- २०% शुटींगच्या वेळी: कामाच्या दिवशी २० टक्के रक्कम जमा करावी लागेल.
- २०% डिलिव्हरीच्या वेळी: उर्वरित २० टक्के रक्कम अल्बम आणि व्हिडिओ डाटा ताब्यात घेताना द्यावी लागेल.
- तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष किरण वाबळे यांनी सांगितले की, या निर्णयामुळे ग्राहक आणि फोटोग्राफर यांच्यातील आर्थिक व्यवहार अधिक स्पष्ट आणि पारदर्शक (Transparent) राहतील.
या बैठकीस अमित कुलथे, प्रकाश गोसावी, भाऊसाहेब खालकर यांच्यासह तालुक्यातील फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

