धन्यवाद ! देवी म्हणून पूजलंत, आता..


धन्यवाद… धन्यवाद…
मनापासून धन्यवाद…!


नवरात्रीच्या या नऊ दिवसांत
विविध रूपात नटले मी,
तुमच्या प्रेमात, आपुलकीत
अगदी हरवून गेले मी…

आरती, प्रसाद, फुलांचा सुगंध,
भक्तीने भरलेले तुमचे डोळे,
‘देवी उदे गं उदे’चा गजर ऐकताना
अंगावर रोमांच उभे राहिले…

काय सांगू लेकरांनो,
मन अगदी भरून आलं,
तुमचं माझ्यावरचं प्रेम पाहून
डोळ्यांत पाणी दाटून आलं…

खरंच, किती भरभरून दिलंत तुम्ही!
प्रेम, काळजी, मान आणि सन्मान…
नऊ दिवस देवी म्हणून जगताना
अनुभवला मायेचा अनमोल सन्मान!

धन्यवाद रे माझ्या मुलांनो,
माझ्यावर एवढं प्रेम केल्याबद्दल…
मला देवी मानून पूजल्याबद्दल,
मनापासून धन्यवाद… धन्यवाद!

पण आता नऊ दिवस संपतील,
देवीचं रूप मागे पडेल,
आणि पुन्हा एकदा
मी हाडामांसाच्या रूपात
तुमच्या जगात परत येईन..

कधी कन्या म्हणून,
कधी पत्नी म्हणून,
कधी मैत्रीण म्हणून,
तर कधी कोणत्याही नात्यापलीकडे
एक हक्काची मैत्रीण म्हणून…

तेव्हा एकच विचार मनात येतो,
माझ्या लेकरांनो, सांगाल का?
देवी म्हणून दिलेला मान
माणूस म्हणूनही द्याल ना?

नऊ दिवस ज्या प्रेमाने
माझ्यासमोर हात जोडलेत,
त्याच प्रेमाने माझ्या भावनांनाही
कधीतरी समजून घ्याल ना?

देवीच्या रूपापलीकडे जाऊन
माझ्या मनाकडे पाहाल ना?
माझ्या हसण्यामागचं दुःख,
माझ्या मौनामागच्या भावना
कधी समजून घ्याल ना?

देवी म्हणून माझी पूजा करताना
जसा सन्मान दिलात,
तसाच रोजच्या आयुष्यातही
माझ्या अस्तित्वाचा मान राखाल ना?

नातं कोणतंही असो,
 शरीराकडे म्हणून न पाहता
माझ्या मनाचा, माझ्या विचारांचा,
माझ्या भावनांचा आदर कराल ना?

नऊ दिवस माझ्यासाठी
भक्तीने हात जोडलेत,
तर वर्षभर माझ्या सन्मानासाठी
मनापासून उभे राहाल ना?

मला सुरक्षिततेची जाणीव,
मला माणूस म्हणून प्रतिष्ठा,
माझ्या भावनांना थोडीशी जागा,
आणि माझ्या अस्तित्वाला मान…
एवढंच तर हवंय मला!

कारण मला देवी म्हणून
फक्त नऊ दिवस जगायचं नाही,
तर एक स्त्री म्हणून
रोज सन्मानाने जगायचं आहे..

माझ्या लेकरांनो,
कारण तीही मीच आहे,
मीही तीच आहे
मग पुन्हा एकदा
मनाच्या अगदी तळातून म्हणेन..

धन्यवाद रे मुलांनो
धन्यवाद… धन्यवाद
देवी म्हणून पूजलत
आता माणूस म्हणूनही जपाल ना?

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !