'MBP Live24'चा दणका ! डॉ. विकास बेडके यांची चौकशी होणार, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिले 'हे' आदेश

'एमडी' असल्याची जाहिरात करत बेकायदेशीरपणे ऍलिओपॅथीची प्रॅक्टिस व लोकांच्या जीवावर बेतणारे उपचार डॉ. बेडके करत आहेत, असा आरोप करणारे मुंगी येथील पीडित कुदुस बिबन पठाण यांची व्यथा रविवारी 'MBP Live24'ने निर्भीडपणे मांडली. त्यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांसह शेवगाव शहर आणि तालुक्यात मोठी खळबळ उडाली. आरोग्य विभागाने तत्काळ त्याची गंभीर दखल घेतली.

                        -ऍड. उमेश अनपट



शेवगाव -
 शहरातील
अथर्व हॉस्पिटलचे संचालक आयुर्वेदिक डॉ. विकास बेडके यांच्यावरील आरोपांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक पोखरणा यांनी दिले आहेत, अशी माहिती शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर काटे यांनी दिली आहे. 

रविवारी पीडित कुदुस बिबन पठाण यांची व्यथा बातमी स्वरूपात प्रसिद्ध होताच काही वेळातच आरोग्य विभाग तत्काळ जागे झाले, हे विशेष. 'MBP Live24'च्या दणक्याने आरोग्य प्रशासन हलल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

डॉ. बेडके यांनी "माझ्या जीवावर बेतणारे उपचार केल्याचा" आरोप करत लेखी तक्रारी द्वारे न्याय मिळविण्यासाठी पीडित रुग्ण कुदुस बिबन पठाण यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी ते थेट आरोग्यमंत्र्यापर्यंत दाद मागितली आहे. वारंवार दाद मागूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे पठाण यांनी न्यायासाठी 'MBP Live24' कडे आपली व्यथा मांडली. त्यानुसार रविवारी (ता. 4) या प्रकरणी वाचा फोडली.

जिल्हास्तरीय कमिटी पाठवणार

"आपल्या तक्रारी संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांचेशी चर्चा झालेली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक त्यासंदर्भात चौकशीसाठी जिल्हास्तरीय कमिटी पाठवणार आहेत", अशी माहिती डॉ. काटे यांनी पीडित पठाण यांना रविवारी तात्काळ व्हाट्सएपच्या माध्यमातून कळविले. ही कमिटी कधी येणार आणि सखोल चौकशी करून पुढील योग्य ती कारवाई कधी करणार, याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण

पीडित कुदुस बिबन पठाण यांनी चार पानी तक्रार अर्जात म्हटले आहे, की मी मोटारसायकल चालवीत आजारी असल्याने उपचारासाठी डॉ. बेडके यांच्या अथर्व हॉस्पिटलमध्ये गेलो. मात्र, गंभीर आजारी असल्याचे सांगून भीती दाखवत मला ऍडमिट करून घेतले होते. 

यानंतर एक्सरे, स्कॅन, रक्त तपासनी आदी तपासण्या करून रोख सुमारे 12 हजार रुपये घेतले. तसेच 8 हजार रुपयांचे मेडिसिन आणण्यास सांगितले. मी स्वतः हॉस्पिटलमधील मेडिकलमधून ते घेऊन आलो.  

यानंतर तेथील कंपाउंडरने मला थेट आयसीयूत दाखल करत माझी ट्रीटमेंट सुरू केली. डॉक्टर बेडके हे थेट दुसऱ्या दिवशी मला तपासायला आले. माझी चार दिवस ट्रीटमेंट चालू होती. दिवसातून एक वेळ डॉक्टर बेडके येऊन पहात. बाकी ट्रीटमेंट नर्स आणि कंपाउंडर हेच देत होते. 

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे माझी तब्येत खालावली आणि मी मृत्यूच्या दारात पोहचलो. या परिस्थितीत तुम्ही बरे व्हाल, असे सांगून डॉक्टर बील भरण्यासाठी मागे लागले. आता मी वाचत नाही, असे मला वाटले होते. शेवटी आमदार ताईंना फोन केल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात जाण्याची सोय केली. 

त्यानुसार मी अम्ब्युलन्सने जिल्हा रुग्णालयात दाखल झालो. यावेळी माझी तब्येत खूपच खराब होती. मला धड बसताही येत नव्हते. सिव्हील हॉस्पिटलमधील ट्रीटमेंटने मला लवकर फरक पडला. मी बरा झालो. मात्र, ही वेळ दुसऱ्या कुणावरही येऊ नये, म्हणून मला चुकीची ट्रिटमेंट देऊन मरणाच्या दारात पोहचविणाऱ्या डॉक्टरच्या विरोधात आवाज उठवला आहे.

अन्यथा उपोषणावर ठाम

माझी आर्थिक लूट करून शारीरिक, मानसिक छळवणूक करून वैद्यकीय सेवेला पैशांसाठी काळिमा फासणाऱ्या डॉ. बेडके यांच्यावर कठोर कारवाई करावी. याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्यांची ही बोगस व जीवघेणी प्रॅक्टिस तात्काळ थांबवावी, अशी माझी मागणी आहे, असे पठाण म्हणाले.

अन्यथा मी माझ्या कुटूंबियांसह शेवगाव तहसील कार्यालया समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा पठाण यांनी आज पुन्हा दिला आहे. तसेच त्यामुळे माझ्या व  कुटूंबाच्या होणाऱ्या नुकसानिस संबंधित डॉक्टर आणि शासन जबाबदार राहील, असेही स्पष्ट केले आहे.

'MBP Live24'चे कौतुक 

फेसबुक, व्हाट्सएप, टेलिग्राम, ट्विटर आदी सोशल मीडियावर 'MBP Live24'वर वाचकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. शहरातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न निर्भीडपणे मांडला आहे, त्यामुळे आरोग्य विभाग तात्काळ जागा झाल्याची भावना वाचकांमध्ये आहे. तसेच लोकांच्या समस्या, प्रश्न मांडण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ असल्याचे मत अनेक वाचकांनी व्यक्त केले आहे. 




Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !