अहमदनगर - ‘अहमदनगर फिल्म फाउंडेशन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अहमदनगर’ (इफ्फा) आयोजित करते. यंदा महोत्सवात मध्य आफ्रिकेतील कॅमेरून देशातून आलेल्या ‘फिशरमन्स डायरी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार, तर जर्मनीतील ‘ऍज द वेव्ह ब्रोक’ या लघुपटाला ‘सर्वोत्कृष्ट लघुपट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जगभरातील दर्जेदार चित्रपटांचा नगरवासियांना आस्वाद घेता यावा, यासाठी हा महोत्सव आयोजित केला जातो. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अहमदनगरचा प्रमुख उद्देश हा वेगवेगळ्या देशांतील तसेच निरनिराळ्या संस्कृतीं मधील दर्जेदार आर्ट फिल्म्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे तसेच उत्तमोत्तम आणि कलाकारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.
मागील तीन वर्षांपासून या महोत्सवाला जगभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. या वर्षी तिसऱ्या पर्वासाठी जगभरातील ५० देशांमधून तब्बल २८५ चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यात चित्रपट, माहितीपट, लघुपट, ॲनिमेशनपट प्रकारांचा सहभाग होता.
सहभागी चित्रपटांपैकी बहुतेकांना यापूर्वीच समीक्षकांनी नावाजले होते आणि त्यांना पुरस्कारही प्राप्त झाला होता. करोनाच्या काळात या महोत्सवात जगभरातून सहभागी झालेल्या दर्जेदार चित्रपट कलाकृती आणि महोत्सवाची वाढत असलेली लोकप्रियता कौतुकास्पद आहे.
यावर्षी महोत्सवासाठी “लव फॉर सिनेमा विल नेव्हर चेंज” म्हणजेच चित्रपटांवरील प्रेम कधीही बदलणारे नाही, असा यंदाचा आशय होता. गौतम मुनोत म्हणाले, कोरोनाच्या परिस्थिती मुळे सर्वांनाच चित्रपट किंवा कलाकृतींचं महत्व उमजलं आहे, घरी बसून सर्वांनीच चित्रपट पाहिले आहेत.
यावर्षी महोत्सवाचे पब्लिक स्क्रिनिंग जरी करता आले नसले, तरीही पुढच्या वर्षी मात्र मोठ्या स्वरूपात फेस्टीव्हल होईल. या महोत्सवासाठी ज्युरी म्हणून चित्रपट समीक्षक संतोष पठारे यांनी काम पाहिले. ते म्हणाले, इफ्फामध्ये अनेक उल्लेखनीय आणि उत्कृष्ट चित्रपटांच्या प्रवेशिका सहभागी झाल्या होत्या.
इफ्फाचे मुख्य आधारस्तंभ विराज मुनोत व प्रशांत जठार हे आहेत. ते म्हणाले, इफ्फामध्ये दरवर्षी चित्रपटांची संख्या वाढत आहे. सध्याची करोनाची परिस्थिती वाईट आहे. मात्र, तरीही आम्ही या चित्रपट महोत्सवाची व्याप्ती आणि स्वरुप आणखी मोठे करण्याचा प्रयत्न करत आहोत.