मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांवरुन देशभरात संतााप व्यक्त होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखीत सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या खास शैलीत त्यांनी मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला. इंधन दरवाढीवरुन त्यांनी सरकारला चांगलेच टोले लगावले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बचतीवरील व्याजदर कपातीचा निर्णय हा नजरचुकीने झाला होता अशी कबुली दिली. तसेच तो मागे घेत असल्याचे सांगितले आहे. पण यावरुन देशभरातून मोदी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता, हे नाना पटोले यांनी लक्षात आणून दिले आहे.
पाच राज्यातील निवडणुकीमुळे तात्पुरता हा निर्णय मागे घेतलेला असू शकतो. नजरचुकीने झालेली चूक १२ तासात सुधारली असली, तरी ट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती वाढवण्याची केलेली ‘घोडचूक’ मोदी सरकार कधी सुधारणार ? असा टोमणा त्यांनी लगावला आहे.
मोदी सरकारवर कडाडून हल्लाबोल
नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून कोणताही दिलासा देणारा निर्णय घेतला गेलेला नाही. प्रत्येक निर्णय हा चुकीच्या पद्धतीने घेतला गेला. उलट जनतेला वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. नोटबंदी, जीएसटी, नियोजन न करता लावलेले लॉकडाऊन या सरकारच्या चुकांमुळे देश अधोगतीकडे गेला, असे पटोले म्हणाले.