गुड न्यूज : राज्यातील एवढ्या रिक्षा चालकांना मिळणार 107 कोटी सानुग्रह अनुदान

7 लाख 15 हजार रिक्षा परवानाधारकांना मिळणार लाभ

परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती

मुंबई : राज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्यानुषंगाने राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवानाधारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज (ता. 21) परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांचे समवेत मंत्रालयात बैठक झाली.

107 कोटी रुपये देणार

राज्यात सात लाख पंधरा हजार रिक्षा परवानाधारक असून त्यांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे एकूण 107 कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांवर थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.

ही माहिती ऑनलाईन भरणे आवश्यक

याकरीता परिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपले आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची ऑनलाईन नोंद करावी लागेल व याची खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात येणार आहे.

हे आहे संकेतस्थळ

या प्रणालीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याकरीता रिक्षा परवानाधारकांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी "सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे. जेणेकरुन या सानुग्रह अनुदानाची रक्कम  वेळेवर अदा करता येईल," असे आवाहन परिवहन मंत्री ॲड. परब यांनी केले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !