बारामती - तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, पुढील दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठकीत दिला.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 'कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठकी’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सद्यस्थितीत बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा, विचार करावा लागेल.
ज्याठिकाणी कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत त्या ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करा. ते करताना नगरसेवकांना विश्वासात घ्या. ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यावर भर द्या, पुणे जिल्हा परिषदेने ज्याप्रकारे कोरोना अपडेटसाठी तयार केले आहे त्याच धर्तीवर बारामती तालुक्यासाठीही ॲप तयार करा.
जेणेकरून कोरोनाची सद्यस्थिती आणि बेडची उपलब्धतेबाबत नागरिकांना माहिती मिळणे सुलभ होईल, अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, नागरिकांपर्यंत पोहचून कोरोनाबाबत जनजागृती करावी, ऑक्सीजन बेडची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी.
बारामती शहरात काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. यावर प्रशासनाने कडक उपाययोजना करुन दंडात्मक कारवाई करावी.
सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लग्नसमारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी नियमानुसार लोकांची संख्या मर्यादित ठेवणे अपेक्षित आहे, याकडे विशेष लक्ष द्यावे. लसीकरणाचा वेग वाढवावा.
सॅनिटायझरचा वापर करावा, कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनसामुग्रीची चांगल्या प्रतीची खरेदी करावी. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, याचीही प्रशासनाने खबरदारी घ्यावी असेही ते म्हणाले.
‘कोरोना’संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार धुणे, गर्दी टाळणे यावर भर देत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.