नवी दिल्ली (MBP LIVE 24) :
बारावीच्या अंतर्गत मूल्यांकन पद्धतीची योजना लवकरात लवकर तयार करून राज्य बोर्डाने १२ वीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने गुरुवारी दिले आहेत. 'एएनआय'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.मूल्यांकन पद्धत १० दिवसांत निश्चित करा
कोर्टाने या महिन्याच्या सुरुवातीला CBSE आणि CISCE बोर्डाला अंतर्गत मूल्यांकन पद्धत ठरवण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी दिला होता. त्याप्रमाणेच राज्य बोर्डाने अंतर्गत मूल्यांकन पद्धत १० दिवसांमध्ये निश्चित करायला हवी, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
'CBSE, CISCE' च्या मुल्यांकनास हिरवा झेंडा
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार CBSE आणि CISCE बोर्डाने याआधीच अंतर्गत मूल्यांकन निकष कोर्टासमोर सादर केले आहेत. सुप्रीम कोर्टाने या मूल्यांकन निकषाला हिरवा झेंडा दाखवला आहे. तसेच मूल्यांकन निकष 'योग्य आणि वाजवी' असल्याची टीप्पणी जोडली आहे.
विद्यार्थी, पालकांची मागणी
देशात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पत्र लिहून लाखो विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. पालक आणि विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती.
21 राज्यात परीक्षा रद्द
असे असले तरी काही पालकांनी मात्र परीक्षा घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्या फेटाळून लावल्या. दहावीच्या परीक्षा याआधीच रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २१ राज्यांनी १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.