अहमदनगर - जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून 'आनंदम्' अंतर्गत 'पालवी' या उपक्रमाचा शुभारंभ झाला. दिनांक 24 जून 21 रोजी 'पालवी'ची पहिलीवहिली वृक्षारोपण मोहिम पार पडली. निसर्ग संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे असल्याचे आनंदमने कृतीद्वारे दर्शवले.
'झाडे केवळ रोपून चालणार नाही तर ती जगवणं ही खरी जबाबदारी आहे' या विचारासह नगर मधल्या विविध वयोगटातील नागरिकांनी श्रमदान केले. सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच सावेडी येथील तीन मंदिर परिसर गजबाजला होता.
माजलेलं गवत, वर्षानुवर्षे साठलेला कचरा आणि मातीचा ढिगारा अशा अवस्थेमधून या परिसराला एका रम्य ठिकाणामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय इथल्या ज्येष्ठ मंडळींनी घेतला आणि काम सुरू केले. त्याच कामाला पुढे नेत, पालवी अंतर्गत विविध क्षेत्रातील नागरिकांनी वृक्षारोपणाचा आनंद घेतला.
जमीन स्वच्छता ,मातीचा आणि सिमेंट चा ढिगारा योग्य ठिकाणी टाकणे, कचऱ्याची विल्हेवाट आणि झाडांसाठी वाफे तयार करणे यामध्ये सर्वजण समर्पित भावनेने जोडले गेले होते. हा उपक्रम यापुढेही असाच सुरु राहणार आहे, अशी माहिती आनंदमचे विशाल लाहोटी यांनी दिली आहे.
झाड लावून ते जगवायचे हीच अंतप्रेरणा सर्वांना होती. जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्या शहराला श्वास घेण्यास मदत करावी असे आवाहन आनंदम् ने केले आहे.