अहमदनगर - जगातील 180 पेक्षा जास्त देशात सामाजिक कार्यक्षेत्र असलेल्या लायन्स इंटरनॅशनल क्लबचे अहमदनगर प्रदेशाध्यक्षपदी संतोष माणकेश्वर यांची नियुक्ती करण्यात आली. लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट संमेलन नुकतेच पुणे येथे पार पडले. या संमेलनात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम. जे. एफ. हेमंत नाईक यांच्या हस्ते माणकेश्वर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय संचालक ए.पी. सिंग यांनी माणकेश्वर यांना पदभाराची शपथ दिली. संतोष माणकेश्वर यांनी जगातील चौदा हजार क्लब व पंचेचाळीस लाखापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर सामाजिक कार्य करण्यास लायन्सच्या माध्यमातून जोडलो गेल्याचे अभिमान व्यक्त करुन भविष्य राबविण्यात येणार्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. लायन्स क्लब हे सेवा कार्य करण्यासाठी अतिशय चांगले व्यासपीठ आहे.
आपण जी सेवा करतो ती मनापासून करायला हवी. गरजूंना मदत घेताना व आपण देताना मनात उपकाराचा नाहीतर, आपलेपणाचा भाव निर्माण व्हावा. त्यासाठी निस्वार्थ भावनेने आपण एकरूप होऊन सेवा कार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.
अहमदनगर शहर, कोपरगाव, संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, राहता, पाथर्डी व राहुरी येथील सर्व चौदा लायन्स क्लबना बरोबर घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी कार्य करण्याचा मानस माणकेश्वर यांनी व्यक्त केला.
माणकेश्वर यांनी त्यांच्या अंतर्गत असलेल्या चौदा क्लबला एकत्रित जोडून ठेवण्यासाठी संपर्क से संवाद या वार्तापत्राचे प्रकाशन केले. या वार्तापत्राच्या माध्यमातून चौदा क्लबच्या महिन्यातील सामाजिक उपक्रमांना उजाळा दिला जाणार आहे. तर दर महिन्याला हे वार्तापत्र काढण्यात येणार आहे.
माणकेश्वर मेकॅनिकल इंजिनिअर असून, सध्या ते नगरच्या नामांकित स्नाईडर इलेक्ट्रॉनिक कंपनीत जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी अर्चना माणकेश्वर या सुद्धा लायन्सच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत.