नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा म्हणजे शैलपुत्री. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते.
देवी सतीच्या आत्मदहनानंतर देवी पार्वतीने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. संस्कृतमध्ये 'शैल' या शब्दचा अर्थ पर्वत आहे. त्यामुळेच या देवीला शैलपुत्री म्हणून ओळखले जाते. सर्व प्रकारची सुख संपत्ती देणाऱ्या चंद्र ह्या ग्रहावर राज्य करणारी ती शैलपुत्री. चंद्राचे काहीही दुष्परिणाम तुमच्या आयुष्यात होत असल्यास शैलपुत्री मातेचे पूजन करावे.
शैलपुत्री मातेचे वाहन आहे वृषभ (बैल). म्हणूनच तिला 'वृषारूढा'सुद्धा म्हणतात. तिच्या एका हातात त्रिशूळ असते. तर दुसऱ्या हातात कमळ. शैलपुत्री मातेला हेमवती तसेच पार्वती देखील म्हणतात. देवीच्या सर्व रूपांमध्ये तिचे या रूपातील सर्वात जास्त महत्व आहे. म्हणूनच तिची नवरात्रीच्या सर्वात पहिल्या दिवशी पूजा करतात.
देवी सती सारखाच तिचा देखील विवाह भगवान शिव यांच्याशी झाला होता. हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे. म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते. तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले गेले आहे.
तसेच देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून मिळते, असे म्हटले जाते.
शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्ध चंद्र स्थापित आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशुल आणि डाव्या हातात कमळाचे फुल आहे. तर चला पूजन करूया नवरात्रीच्या प्रथम दिवशी शैलपुत्री मातेचे.
शब्दांकन - दिपाली विजय माळी (अ.नगर)