अहमदनगर - प्रशांत गडाख यांचा खासगी स्वीय सहायक असलेल्या प्रतीक काळे नावाच्या युवकाने काही दिवसांपूर्वी गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी या प्रकरणी आरोप करत जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर मृत प्रतिक काळे याच्या बहिणीनेही देखील गडाख कुटुंबियांविषयी भाष्य केले आहे.
गडाख यांच्या शिक्षणसंस्थेत, तसेच सहकारी कारखान्यात कामाला असलेल्या व्यक्तींच्या मानसिक त्रासाला कंटाळून प्रतिक काळे याने आत्महत्या केली, असे प्रतिकच्या बहिणीने फिर्यादीत म्हटले आहे. मंत्री गडाख यांचा चांगला विश्वास संपादन केल्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांना हे खटकत होते, म्हणून ते प्रतिकला त्रास देत होते, असे त्याच्या बहिणीने म्हटले आहे.
आता भाजप आक्रमक झाल्यानंतर प्रतिकच्या बहिणीने एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. त्यात तिने प्रतिकला त्रास देणाऱ्या व्यक्तींचा नामोल्लेख केला आहे. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच प्रतिकने गळफास घेतल्याचे ती सांगते. तसेच या प्रकरणाशी गडाख कुटु्ंबियांचा कोणताही संबंध नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
तिने फिर्यादीतही गडाख कुटुंबियांपैकी कोणाचाही आरोपी म्हणून उल्लेख केलेला नाही. दुसरीकडे भारतीय जनता पक्ष मात्र जलसंधारण मंत्री गडाख यांच्यावर वारंवार निशाणा साधत आहे. बुधवारी दुपारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेतही भाजपने गडाख यांची सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच त्यांनी राजीनामा द्यावा, असे म्हटले आहे.