मुुंबई - बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन आदेश शनिवारी सार्वजनिक झाला, त्यात धक्कादायक बाब समोर आली आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात २६ दिवस पोलिस आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यन खानविरुद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे कोणतेही पुरावे नाहीत, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला आहे.
जामिनाच्या आदेशासह न्यायालयाने १४ पानी आदेश दिले. त्यात आर्यन आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे. या जामीनाच्या आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की...
सर्व आरोपींनी बेकायदेशीर कृत्य करण्याचा समान हेतू आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणताही ऑन-रेकॉर्ड सकारात्मक पुरावा कोर्टासमोर सादर करण्यात आला नाही. अर्जदारांविरुद्ध कट रचल्याचा खटला सिद्ध करण्यासाठी पुराव्याच्या स्वरूपात मूलभूत सामग्री असावी, यासाठी न्यायालय संवेदनशील आहे.
केवळ आर्यन आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा एकाच क्रूझवर होते, त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप होऊ शकत नाही, असेही हायकोर्टाने म्हटले आहे. तसेच केवळ कबुलीजबाबावर विसंबून राहू शकत नाही, कारण ते बंधनकारक नाही, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.
काय होते प्रकरण ?
दि.. २ ऑक्टोबरच्या रात्री NCB ने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या जहाजावर रेव्ह पार्टीवर छापा टाकला. यावेळी आर्यन खानसह मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट आणि अनेकांना ड्रग्ज घेण्याच्या आणि व्यापाराच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते.
कधी आला तुरुंगाबाहेर ?
आर्यन खानला दि. २८ ऑक्टोबर रोजी १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता, परंतु कागदोपत्री उशीर झाल्यामुळे तो २९ ऑक्टोबर रोजी तुरुंगातून घरी पोहोचला. सुमारे २६ दिवस तो कोठडीत होता.