नवी दिल्ली - भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये स्थानिक भाषेत प्रसारण सेवा देणारे माध्यम म्हणून 'दूरदर्शन'ची ओळख आहे. दूरदर्शन प्रसारण सेवेने आता आणखी एका नव्या भाषेमध्ये आपली प्रसारण सेवा सुरु केली आहे. उत्तर प्रदेश राज्यात 'भोजपुरी' भाषेतील प्रसारण सेवा सुरू करण्यात आली आहे.
दूरदर्शनवर हिंदी, इंग्रजी, उर्दू किंवा इतर भाषांसोबतच आता भोजपुरी भाषेतही कार्यक्रमांचे प्रसारण सुरू झाले आहे. बिहार आणि नेपाळमधील प्रेक्षकांनाही दूरदर्शनच्या 'गोरखपूर' केंद्रावरून प्रसारित होणारे हे कार्यक्रम पाहता येणार आहेत. ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून 'डीडी उत्तर प्रदेश' वाहिनी सुरू झाली.
भोजपुरी भाषेत दूरदर्शनची वाहिनी असावी, ही पूर्वांचलच्या लोकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती आता पूर्ण होत असल्याने येथे जल्लोष साजरा केला आहे. गोरखपूर दररोज एक तास भोजपुरी कार्यक्रम प्रसारित करेल. ज्यामुळे या प्रदेशातील बोलीभाषा आणि संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला जाईल.
भोजपुरी कार्यक्रम डीटीएचच्या माध्यमातून देशात पाहता आणि ऐकता येतील. दि. ११ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माहिती आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दूरदर्शन गोरखपूर केंद्रात स्थापन केलेल्या जिओ उपग्रह केंद्राचे उद्घाटन केले.
या कार्यक्रमांमध्ये भोजपुरिया संस्कृतीचे विविध रंग पाहायला मिळणार आहेत, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमांमध्ये भोजपुरी लोकगीते आणि भोजपुरी बोली प्रदेशातील प्राचीन वारसा आणि परंपरांवरील लघु नाटके, रूपक आणि माहितीपट यांचा समावेश केला जाणार आहे.
याशिवाय परिसरात होत असलेल्या विकास आराखड्यांवर आधारित कार्यक्रमांशिवाय तरुणांच्या समस्या आणि महिलांच्या गरजा लक्षात घेत विविध स्वरूपाचे कार्यक्रम तयार केले जातील. यात भोजपुरी बोली आणि स्थानिक परंपरांसोबतच कला आणि साहित्यालाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.