'फ्लिपकार्ट'मुळे स्थानिक वस्तुंना मिळणार देशव्यापी बाजारपेठ

राज्य शासन-फ्लिपकार्ट यांच्यादरम्यान सामंजस्य करार

मुंबई - महाराष्ट्र शासनाचे लघु उद्योग महामंडळ तसेच खादी ग्रामोद्योग मंडळाने आज ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्टसोबत सामंजस्य करार केला. या करारामुळे राज्यातील स्थानिक कामगार विणकर, हस्तकलाकार आणि छोट्या उद्योगांनी तयार केलेल्या वस्तुंना देशव्यापी बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

या सामंजस्य करारावर उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग, खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निलिमा केरकेटा, लघु उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे व फ्लिपकार्टच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या करारामुळे ग्रामीण भागातील कारागिर, विणकर, हस्तकलाकार आणि छोट्या उद्योगांतून तयार होणाऱ्या वस्तू तसेच पैठणी साड्या, लाकडी खेळणी, हताने बनविलेल्या वस्तू, दागिने, कागदी वस्तु, पर्स तसेच हस्तकलेच्या इतर वस्तू फ्लिपकार्टद्वारे विकल्या जातील.

या कराराद्वारे राज्यातील १२ कोटी जनतेपर्यंत जिल्ह्याजिल्ह्यात तयार होणाऱ्या विविध वस्तू पोहोचतील, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे फ्लिपकार्टने मराठी भाषेतून आपली संकेतस्थळ व अँल्पिकेशन विकसित केले असून या निर्णयाचे देसाई यांनी स्वागत केले. 

फ्लिपकार्टद्वारे ग्रामीण भागातून तयार होणाऱ्या वस्तुंचे पॅकेजिंग, ब्रँडींग करण्यासाठी कारागिरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच या वस्तुंची विनामूल्य फोटोग्राफी केली जाईल, अशी माहिती फ्लिपकार्टचे प्रमुख अधिकारी रजनीश कुमार यांनी दिली.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !