किरकोळ भांडणातून युवकाचा खून करणाऱ्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा

अहमदनगर - व्यवहारातून झालेल्या वादातून एका युवकाचा खून केेल्याप्रकरणी दोघा जणांना दोषी धरून जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रोहित रमेश कांबळे व शुभम शाम कांबळे (दोघे रा. सदर बाजार, भिंगार) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी शेखर देविदास गायकवाड या युवकाचा खून केला होता.


जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. व्ही. कुर्तडीकर यांनी सोमवारी दुपारी हा निकाल सुनावला. दि. १ मार्च २०१७ रोजी भिंगारमध्ये सदर बाजारात शेखर गायकवाड आणि कांबळे कुटुंबियांचे भांडण झाले होते. शुभम कांबळे याने गाडी घेण्यासाठी शेखरला पैसे दिले. शेखरने त्याला जुन्या वापराची दुचाकी घेऊन दिली होती. 

पण शुभमला ती आवडली नसल्याने त्यांचे वाद झाले. पालखीच्या ओट्याजवळ माला रमेश कांबळे, रोहित रमेश कांबळे, शुभम शाम कांबळे या तिघांनी शेखरला मारहाण करून त्याचा खून केला. याप्रकरणी शेखरच्या भावाने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

पोलिसांनी माला कांबळे, रोहित कांबळे व शुभम कांबळे यांच्याविरूद्ध खुन करणे, आर्म अॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल केला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तपास करून न्यायालयात चार्जशिट दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फें अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले.

सरकार पक्षातर्फे अॅड. पवार यांनी ११ साक्षीदार तपासले. त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शेखरचा भाऊ, तपासी अधिकारी विनोद चव्हाण, शवविच्छेदन करणारे डॉ. मनोज घुगे, आरोपींची वैद्यकीय तपासणी करणारे डॉ. अशोक खटके यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

न्यायालयाने रोहित व रमेश कांबळे यांना जन्मठेप, प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड, हा दंड न भरल्यास १ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. रोहितला आर्म अॅक्टनुसार१ वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड ठोठावला. तर माया कांबळे हिला संशयाचा फायदा देत मुक्त केले. 

या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील पवार यांना ऍड. सतीश पाटील यांचे मागदर्शन, तर पोलिस कर्मचारी एन. ए. थोरात व डी. एच. खेडकर यांचे सहकार्य लाभले. किरकोळ भांडणात एका युवकाला प्राण गमवावे लागले, तर दोन युवकांना जन्मठेपेची शिक्षा नशिबी आली आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !