जबरदस्त ! राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचा 'डंका', मुला-मुलीच्या दोन्ही संघांना विजेतेपद

महाराष्ट्र संघाला सहाव्यांदा दुहेरी मुकूट

अलताफ कडकाले (उना, हिमाचल प्रदेश) - येथील इंदिरा गांधी स्टेडीयमवर राष्ट्रीय किशोर - किशोरी अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने इतिहास रचला. आज झालेल्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या किशोरांनी कर्नाटकवर, तर किशोरींनी पंजाबवर विजय मिळवत दुहेरी मुकुटासह अजिंक्यपद मिळवले. 

किशोर गटाने आतापर्यंत १० वेळा तर किशोरीने गटाने १५ वेळा विजेतेपद पटकावली आहेत. किशोर गटाने सलग ६ वेळा विजेतेपद कायम राखले आहे. 

झारखंड येथे मागील वर्षे झालेल्या स्पर्धेत किशोरींना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. ती कटू आठवण या विजयाने पुसून काढली. तर या वेळी महाराष्ट्राला मिळवलेले हे सहावे दुहेरी अजिंक्यपद आहे. 

या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू 'भरत पुरस्कार' आशिष गौतमला तर 'ईला पुरस्कार' सानिका चाफेला देऊन गौरवण्यात आले.  

अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या किशोर संघाने कर्नाटकवर १०-६ असा एक डाव ४ गुणांनी विजय मिळवत कर्नाटकचा धुव्वा उडवला. या सामन्यात महाराष्ट्राने सुरवातीपासूनच कर्नाटकला डोक वर काढण्याची जराही संधी दिली नाही. 

महाराष्ट्राच्या आशिष गौतम (२:१०, ३:१० मि. संरक्षण व १ गडी), जितेंद्र वसावे (२:००, १:३० मि. संरक्षण), हाराद्या वसावे (१:२०, २:०० मि. संरक्षण व २ गडी), अथर्व पाटील (नाबाद १:३० मि. संरक्षण) व मोहन चव्हाण (३ गडी) व कर्णधार सोत्या वळवी (२ गडी) व राज जाधव (२ गडी)  यांनी विजयात चमकदार खेळी केली. 

महाराष्ट्राचे संघ प्रशिक्षक प्रफुल्ल हाटवटे, व्यवस्थापक मंदार परब व फिजिओ डॉ. किरण वाघ यांनी हा सांघिक विजय असल्याचे संगितले.

महाराष्ट्राच्या किशोरींनी अंतिम फेरीच्या सामन्यात पंजाबला ११-३ असा एक डाव ८ गुणांनी धूळ चारली. या स्पर्धेतील सर्व सामने डावाने जिंकले होते. त्यात प्रशिक्षक मुंबईच्या एजाज शेख यांचा मोठा वाटा आहे. 

कोविड पार्श्वभूमीवर छोटे खेळाडू जवळजवळ दिड-दोन वर्षे मैदानात नव्हते. अशा वेळी खेळाडुंमध्ये समन्वय घडवणे व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांच्याकडून अप्रतिम कामगिरी घडवून घेणे हे काम एजाज शेख यांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले. 

महाराष्ट्राच्या कर्णधार सानिका चाफे (५:५०, नाबाद ३:१० मि. संरक्षण व ४ बळी), सुषमा चौधरी (नाबाद १:१०, २:५० मि. संरक्षण व १ बळी), धनश्री कंक (१:०० मि. संरक्षण) व अंकिता देवकर (४ बळी), धनश्री करे (१ बळी), समृध्दी पाटील (१ बळी) यांनी महाराष्ट्राच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी केली. 

पंजाबच्या खेळाडूंना महाराष्ट्राच्या खेळाडूंसमोर मैदानात टिकाव धरता आला नाही हेच खरे. या विजयानंतर प्रशिक्षक एजाज शेख व व्यवस्थापिका प्रियांका चव्हाण यांनी या चमकदार कामगिरीवर समाधान व्यक्त केले.

भारतीय खो खो महासंघाचे संयुक्त सचिव डॉ. चंद्रजीत जाधव व महाराष्ट्र खो खो असो.चे  सचिव अॅड. गोविंद शर्मा यांनी या महाराष्ट्र व हिमाचल प्रदेश येथील प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या विजयाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांचे अभिनंदन केले आहे.  

यापूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या किशोर संघाने हरयाणाचा १३-७ असा एक डाव ६ गुणांनी धुव्वा उडवला. तर किशोरींनी दिल्लीचा १०-६ असा ४ गुणांनी पराभव केला होता.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !