नेट गायब, यंत्रणा सुस्त; गैरसोईने नागरिक हवालदिल,
मंत्री सुभाष देसाई, सुनील तटकरे यांनी लक्ष घालण्याची मागणी
म्हसळा : कोकणातील विकासाला चालना देण्यासाठी विविध योजनांच्या पायघडया राज्य सरकारने अंथरल्या आहेत. मात्र, रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाला या विकासाचे वावडे झाल्याचे चित्र सध्या दिसून येतेय. येथील ठप्प पडलेल्या यंत्रणेमुळे होणाऱ्या गैरसोईने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. कोकणच्या विकासाला आडवे जाणाऱ्या या दुय्यम निबंधक रुपी मांजराला आवरण्याचे साकडे थेट उद्योग मंत्री सुभाष देसाई व मंत्री सुनील तटकरे यांना त्रस्त नागरिकांनी घातले आहे.
राज्य सरकारने विविध प्रकल्प, माणगाव एमआयडीसी, तिसरी मुंबई आदी विकास योजना कोकणचे नंदनवन करण्यासाठी प्रस्तावित केल्या आहेत. विकासाच्या या चर्चेमुळे पुणे, मुंबई येथील अनेक बांधकाम व्यावसायिक कंपन्यांनी येथे टाऊनशिप सारखे प्रकल्प उभारण्यास गती दिली आहे.
त्यातीलच एक 'ड्रीम कोकण सिटी' हा सुमारे पाचशेहून अधिक एकरात उभारण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. राज्यभरातील गुंतवणूकदार या प्रकल्पात आपली वर्णी लागण्यासाठी जागा खरेदी करत आहेत. एकूणच या विकासाचा फायदा घेण्यासाठी राज्यभरातील लोक येथे आकर्षित होत आहेत. त्यामुळे म्हसळा तालुक्यात जमीन खरेदी आणि विक्रीसाठी झुंबड उडाली आहे.
जमीन खरेदी-विक्रीसाठी स्थानिकांसह बाहेरील लोक येथील दुय्यम निबंधक कार्यालयात येत आहेत. मात्र, येथील नेटचा उडत असलेला फज्जा, ढिसाळ यंत्रणा यामुळे होणाऱ्या त्रासाने नागरिक पुरते वैतागले आहेत. राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांना दिवसभर ताटकळत बसूनही काम न झाल्याने मोकळ्या हाताने परतावे लागत आहे. अनेक चकरा मारून वेळ व पैशांची नासाडी होत आहे.
मोठ्या प्रमाणात महसूल देणाऱ्या या कार्यातील गैरसोईबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मंत्री सुनील तटकरे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे.
पाच दिवस कामकाज, सक्षम अधिकारी द्या
आधी आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार हे दोनच आणि आता मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस चालणाऱ्या या कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे म्हणजे पाच दिवस चालावे अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
सह्यांची मोहीम
या कार्यालयातील ढिसाळ नेट च्या यंत्रनेत दुरुस्ती होण्यासाठी शंभरहून अधिक नागरिकांनी सह्या केलेला अर्ज अलिबाग येथील जिल्हा सह निबंधक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. त्वरित येथील नेट (इंटरनेट) ची सेवा बदलून चांगल्या, गतिमान कंपनीचे नेट यंत्रणा बसवावी, अशी मागणी केली आहे. तसेच पुणे येथील आयजीआर कर्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही लेखी तक्रार करून याबाबत दाद मागितली आहे.
म्हात्रे विषयी नागरिकांमध्ये नाराजी
दुय्यम निबंधक कार्यालयातील तात्पुरती जबाबदारी पहाणारे कर्मचारी म्हात्रे हे अक्षम आहेत. त्यांना कामाचा उरक नाही. ते केवळ अडचणींचा पाढा वाचतात. कामा एवजी त्यांना 'दुसरीकडेच रस' आहे. स्थानिक आणि बाहेरून येणारे नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी म्हात्रे यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजीचा पाढाच वाचताना या कार्यालयात कायमस्वरूपी जबाबदार व कार्यक्षम अधिकारी देण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या या नाराजीमुळे म्हात्रे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे रहात आहे.
मी हतबल : म्हात्रे
म्हसळा दुय्यम निबंधक कार्यालयाचा तात्पुरता कारभार हाकणारे कर्मचारी म्हात्रे म्हणतात, " मी हतबल आहे. काम करायला अडचणी आहेत. यंत्रणा, स्टाफ कमी आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी सारखी डिस्कनेक्त होते. यामुळे मी हतबल आहे."