नाशिकच्या सिनीयर अंडर ऑफिसर उपकार ठाकरेने स्वीकारला चषक
आंध्रप्रदेश व तेलंगना संचालनालयास विजेते पदाचा बहुमान
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त उपविजेत्यापदाचे चषक नाशिक येथील भोसला सैनिकी महाविद्यालयाचा कॅडेट तथा सिनीयर अंडर ऑफिसर उपकार ठाकरे याने स्वीकारले.
देशातील एकूण 17 एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर 2019 ते नोव्हेंबर 2020 मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी 1 ते 28 जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबीरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर आज प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात महाराष्ट्राला उपविजेत्या पदाचा तर आंध्रप्रदेश व तेलंगना संचालनालयास विजेते पदाचा बहुमान देण्यात आला. महाराष्ट्राने यापूर्वी 17 वेळी प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान पटकाविला आहे.
एनसीसी वायुदलाच्या बेस्ट कॅडेटसाठी देशातील एकूण 100 कॅडेट्समध्ये चुरस होती. लेखी परीक्षा, समूह चर्चा आणि एनसीसी महासंचालकांसमोर प्रत्यक्ष मुलाखत व शिबिरातील परेड या निकशांवर बेस्ट कॅडेट्ची निवड करण्यात आली.
महाराष्ट्राची उत्कृष्ट कामगिरी - कर्नल प्रशांत नायर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या एनसीसी संघाने यावर्षी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दिल्लीतील कॅन्टॉनमेंट भागात आयोजित एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात महाराष्ट्रातील 16 मुल व 10 मुली असे एकूण 26 कॅडेट्स सहभागी झाले.
पुणे येथे 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 2020 दरम्यान या कॅडेट्सचा कसून सराव झाला व कोरोना चाचण्याअंती हे कॅडेट्स 1 जानेवारी 2021 रोजी दिल्लीतील शिबिरात सहभागी झाले. प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या पथ संचलनात सहभागी देशभरातील एनसीसीच्या 100 मुलींच्या तुकडीत महाराष्ट्राच्या 10 ही मुलींची निवड झाली.
विशेष म्हणजे या मुलींच्या तुकडीचे नेतृत्व महाराष्ट्राच्या संघातील जळगावच्या मुलजी जेठा महाविद्यालयाची विद्यार्थीनी सिनीयर अंडर ऑफिसर समृद्धी संतने केले. राजपथावर महाराष्ट्रातील 16 पैकी 11 मुलांची निवड राजपथवरील पथ संचलनासाठी झाली.
याशिवाय वायुदलाच्या बेस्ट कॅडेट्समध्ये पुण्यातील श्रीशिवाजी सोसयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी विवेक सिंग ने दुसरे स्थान तर नौदलाच्या बेस्ट कॅडे्टसमध्ये पुण्याच्याच मॉर्डन महाविद्यालयाच्या तनाया नलावडे ने दुसरे स्थान पटकाविले.