खळबळजनक ! कुख्यात 'सागर भांड टोळी' राहुरी जेलमधून पसार, गेल्या आठवड्यात लागला होता 'मोक्का'

राहुरी (जि. अहमदनगर) - कुख्यात गुंड सागर आण्णसाहेब भांड याच्यासह त्याच्या टोळीने राहुरीच्या कारागृहातून पलायन केले आहे. कारागृहाच्या खिडकीचे गज कापून या आरोपींनी पलायन केले आहे. भांड हा पोलिसपुत्र असून त्याच्यावर काही दिवसांपूर्वीच मोक्का कायद्यानुसार कारवाई झाली होती.


सागर भांड याच्या टोळीने राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीला लुटले होते. हा गुन्हा भांड याच्या टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी ही टाेळी जेरबंद केली. भांड याची टोळी वारंवार अशा स्वरुपाचे गुन्हे करत असल्याने पोलिसांनी मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठांना पाठवला होता.


नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यामुळे सागर भांड व त्याच्या टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली. ही टोळी सध्या राहुरी कारागृहात होती. त्यांच्या पलायनाची माहिती समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

असे केले पलायन - शनिवारी पहाटे या टोळीने जेलमधून पलायन केल्याची बाब समोर आली. भांड आणि त्याच्या टोळीने कारागृहाच्या मागील बाजूला असलेल्या खिडकीचे गज आणि जाळी कापली. त्यातून सर्व आरोपी पळून गेलेे. पोलिसांनी तत्काळ परिसरात नाकाबंदी केली, मात्र उपयोग झाला नाही.

कोण आहे सागर भांड ? - नगर शहरातील ढवणवस्ती परिसरात राहणारा सागर भांड हा पोलिसपुत्र आहे. त्याने काही युवकांची टोळी तयार करून महामार्गांवर लुटमार सुरू केली. त्याच्याविरूद्ध राहुरी, संगमनेर, शिर्डी, शिक्रापूर (जि. पुणे,) गंगापूर (जि. औरंगाबाद), एमआयडीसी, कोतवाली, तोफखाना, सुपा, पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

भांड टोळीचे कारनामे - या टोळीविरूद्ध संघटीतपणे दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रासह जबरी चोरी करणे, दरोड्याची तयारी करणे, कट रचून स्वत:च्या फायद्यासाठी दहशत निर्माण करणे, आदी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नाेंद आहे. या टोळीविरूद्ध तब्बल ३२ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

कोण कोण होते टोळीत ? - राहुरी पोलिस ठाण्यात ज्या गुन्ह्यात मोक्कानुसार कारवाई झाली, त्यात सागर भांड याच्यासह सहा जणांचा समावेश होता. यामध्ये गणेश माळी (वरवंडी, ता. राहुरी), नितीन माळी (मोरेचिंचोरे, ता. नेवासा), रवि लोंढे (घोडेगाव, ता. नेवासा), निलेश शिंदे (पाईपलाईन रोड, नगर), रमेश शिंदे (राहुरी).

दोघांना पकडले, तीन जण फरारच - आरोपींनी पलायन केल्याचे वृत्त समजताच पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. स्टेशन रोड परिसरात दोन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले. इतर तिघे मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !