श्रीरामपूर (जि. अहमदनगर) - रविवारचा दिवस. सर्वांची निवांत वेळ.. कुठली गडबड नाही की कुठे जायची लगबग नाही. पण अचानक डरकाळी ऐकायला आली म्हणून सगळे घराबाहेर आले. पहातात तो काय.. चक्क बिबट्या वस्तीत घुसलाय. मग एकच पळापळ उडाली. लाेकांचीही आणि त्यांना घाबरून बिथरलेल्या बिबट्याचीही.
श्रीरामपुरातील मोरगे वस्ती परिसरात बिबट्या आणि नागरिकांच्या पाठशिवणीचा हा खेळ तब्बल चार तास रंगला. यानंतर वन विभागाचे कर्मचारी आणि पोलिस दल घटनास्थळी आले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन एका घरात लपलेल्या बिबट्याला ताब्यात घेतले. त्यामुळे वस्तीवरील लोकांची सुटकेचा निश्वास सोडला.
सुरुवातीपासून म्हणजे पळापळ करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करणारा बिबट्या, वस्तीतून वाट दिसेल तिकटे पळणारा बिबट्या.. ते एका घराच्या मागच्या बाजूला असलेल्या खिडकीच्या काचा फोडून ताब्यात घेतलेला बिबट्या.. असा चित्तथरारक खेळ काही नागरिकांनी दुसऱ्या घरांच्या छतावर चढून कॅमेऱ्यात कैद केला.
माेरगे वस्ती परिसर हा श्रीरामपूरच्या एका बाजूला असलेला परिसर आहे. श्रीरामपूर हे शहर असले तरी या परिसराला लागूनच ऊसाची व इतर पिकांची शेतीही आहे. त्यामुळे या पिकात बिबट्याचे वास्तव्य असण्याची शक्यता आहे. एक बिबट्या पकडला असला, तरी नागरिकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण आहे.
बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात फिरताना हातात घुंगराची काठी, टॉर्च आणि मोबाईल किंवा रेडिओवर मोठ्या आवाजात गाणी लावावीत. जेणेकरून बिबट्याला तुम्ही येण्याची चाहूल लागेल. त्यामुळे तो त्याचा मार्ग बदलून जाईल. घराबाहेर, उघड्यावर किंवा अंगणात झोपू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.