यादी आहे खूप मोठी 
कुणाकुणाचे आभार मानू ?
सुखाचे सारे सोबती 
दुःखात कुणाचे आभार मानू ?
उन्हाच्या झळा लागू नये म्हणुन
सावली होणाऱ्याचे आभार मानू ?
की, रोज नवी परिक्षा घेवून 
खंबीर बनवनाऱ्या नियतीचे आभार मानू ?
अर्ध्यात साथ सोडणाऱ्या 
आपल्यांचे आभार मानू ?
की, दुःखात हात देणाऱ्या 
परक्यांचे आभार मानू ?
चार घटका वाट्यास आले
त्या हास्याचे आभार मानू,
की, मला सदा सांभाळणाऱ्या 
आसवांचे आभार मानू ?
प्रेम, माया, आपुलकीच्या 
रित्या ओंजळीचे आभार मानू, 
की, शब्दफुलांनी ओंजळ भरणाऱ्या 
प्रतिभेचे आभार मानू ?
मला सतत डिवचणाऱ्या 
गुणीजणांचे आभार मानू ?
की, मला माझीच नव्याने ओळख करून देणाऱ्या 
माझ्यातल्या 'मी'चे आभार मानू ?
जपून चालायला शिकवणाऱ्या
निसरड्या वाटेचे आभार मानू ?
की, चालतांना तोल सावरणाऱ्या 
खंबीर पावलांचे आभार मानू ?
माझे जहाज बुडताना सोडून गेलेल्या 
त्या उंदरांंचे आभार मानू ?
की, गरज लागली तरच 
हाक मारणारांचे आभार मानू ?
सांगा कुणा कुणाचे अन.. 
कशा कशाचे आभार मानू ?
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
